बारामुल्ला (जम्मू आणि काश्मीर) - उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमधील गुंड ब्राथ भागात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. यात बंदी घातलेल्या लष्कर-ए-तोयबा संघटनेच्या उच्चपदस्थ कमांडरला सुरक्षा दलाने कंठस्नान घातले. शनिवारी सायंकाळी सुरक्षा दलाने दहशतवाद्यांच्या अड्ड्याला घेरल्यानंतर ही चकमक घडली.
पोलीस दलातील सूत्रांनी सांगितले की, मोस्ट वॉन्टेड अतिरेकी मुदस्सीर पंडित हा सुरक्षा दलांवर झालेल्या हल्ल्यात आणि राजकीय कार्यकर्त्यांवरील अनेक हल्ल्यांमध्ये सहभागी होता. चकमकीत ठार झालेल्या आणखी एका अतिरेकीचे नाव आसार उर्फ अब्दुल्ला असे असून तो पाकिस्तानचा रहिवासी आहे. तो 2018 पासून भागात सक्रिय होता. लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी मुदस्सीर पंडित हा 3 पोलीस, 2 नगरसेवक आणि 2 नागरीकांच्या हत्येत सहभागी होता, असे पोलीस निरीक्षक विजय कुमार यांना सांगितले.
पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन -
भारत आणि पाकिस्तानच्या बॉर्डरवर सतत शस्त्रसंधीच्या उल्लंघनाच्या घटना पाकिस्तानकडून घडत असतात. 2020 या वर्षामध्ये पाकिस्तानकडून भारत - पाकिस्तानच्या सीमेवर तब्बल 4665 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या 17 वर्षांत पाकिस्तानने तब्बल 11 हजार पेक्षा अधिकवेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळातील यूपीए सरकारच्या काळामध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन होण्याचे प्रमाण हे हाताच्या बोटांवर मोजण्याएवढे होते. मात्र, 2014 मध्ये भाजप सरकार आल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तणाव वाढला असून, सीमेवर मोठ्या प्रमाणात शस्त्रसंधीचे उल्लंघन पाहायला मिळाले आहे.