अनाकापल्ली (आंध्र प्रदेश) : एकीकडे देशात टोमॅटोच्या दरात प्रचंड वाढ होत असताना आता टोमॅटोबाबत दिवसेंदिवस विचित्र घटना उघडकीस येत आहेत. टोमॅटो विकून काही शेतकरी रातोरात करोडपती होत आहेत. तर अनेक ठिकाणी चोरट्यांनी शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेले टोमॅटो लुटल्याचे प्रकार घडले आहेत. यामुळे अनेक टोमॅटो विक्रेत्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. तर दुसरीकडे टोमॅटो व्यापारी पोलीस संरक्षण घेत आहेत.
भाविकाने केली टोमॅटोतुला : सोशल मीडियावर तर टोमॅटोवरील मीम्स आणि जोक्सला काही सीमाच नाही. कोणी टोमॅटो विकत घेतला तर तो खूप श्रीमंत आहे, असे म्हणत लोक खिल्ली उडवत आहेत. आता या संदर्भात आणखी एक विचित्र घटना समोर आली आहे. आंध्र प्रदेशच्या अनाकापल्ली जिल्ह्यातील नुकलम्मा मंदिरात एका भाविकाने चक्क टोमॅटोतुला केली आहे. सध्या एक किलो टोमॅटोचा भाव 120 रुपयांपेक्षा जास्त असल्याने ही तुला खास आकर्षणाचा विषय ठरली आहे.
तुलामध्ये ५१ किलो टोमॅटो अर्पण : ही टोमॅटोतुला पाहून मंदिरात आलेले भाविकही थक्क झाले होते. अनाकापल्ली येथील रहिवासी अप्पाराव, त्यांची पत्नी मोहिनी आणि त्यांची मुलगी भविष्या हे टोमॅटो घेऊन मंदिरात आले. त्यानंतर त्यांनी सुमारे 51 किलो टोमॅटोंसह तुला केली. देवस्थानच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या टोमॅटोचा वापर मंदिराच्या कार्यक्रमात केला जाईल.
स्मार्टफोन खरेदीवर टोमॅटो फ्री : देशभरात गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे भाव प्रचंड वाढले आहेत. एरवी 30 ते 40 रुपये किलो दराने विकले जाणारे टोमॅटो आता चक्क 150 ते 170 रुपये किलो दराने मिळत आहेत. यामुळे सर्वसामान्यांचे बजेट मात्र पूर्णपणे कोलमडले आहे. आता टोमॅटोच्या वाढत्या किमतीचा फायदा घेत मध्य प्रदेशच्या एका मोबाईल विक्रेत्याने एक अनोखी ऑफर आणली आहे. हा दुकानदार त्याच्या दुकानातून स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 2 किलो टोमॅटो फ्री देत आहे. दुकानदाराच्य़ा या ऑफरनंतर ग्राहकांमध्ये याबद्दल आकर्षण निर्माण झाले आहे. तसेच या दुकानात येणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे.
हेही वाचा :