आज विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला जाणार
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन एक मार्चपासून सुरू आहे, दरम्यान आज विधानसभेत अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात काही नव्या योजनांची घोषणा करण्यात येणार का? हे पाहाणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
आज विरोधी पक्षांची पत्रकार परिषद होण्याची शक्यता
दरम्यान अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर भाजप आणि इतर विरोधी पक्षांची पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे, या पत्रकार परिषदेमध्ये विरोधी पक्षातील प्रमुख नेते अर्थसंकल्पबाबत आपले मत व्यक्त करतील.
अर्थमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषद
अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर अर्थमंत्री अजित पवार हे आज साडेचार वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत, या पत्रकार परिषदेमध्ये ते त्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर बोलतील.
आजपासून दिल्लीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात
आजपासून दिल्लीचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व काळजी घेऊन अधिवेश पार पडत असल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीने देण्यात आली आहे, दरम्यान दिल्लीमध्ये कोरोनाने धुमाकूळ घातला होता, अनेकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकार आपल्या अर्थसंकल्पामध्ये आरोग्य क्षेत्रावर भरीव तरतूद करण्याची शक्यता आहे.
आज जागतिक महिला दिन
आज 8 मार्च आहे, 8 मार्च हा जगभरात जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
आज राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा वाढदिवस
आज राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा वाढदिवस आहे, त्या आपला वाढदिवस अतिशय साधेपणाने साजरा करणार असून, त्या आज विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.
आजपासून भोपाळ आणि इंदौरमध्ये रात्रीची संचारबंदी
मध्य प्रदेशमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे, मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ आणि इंदौर या दोन प्रमुख शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. त्यामुळे सरकारकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून या दोन शहरांमध्ये रात्रीची संचारबंदी सुरू करण्यात आली आहे.