भाजप नेते किरीट सोमैया यांची पत्रकार परिषद
भाजप नेते किरीट सोमैया यांची आज दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. किरीट सोमैया यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जमीन घोट्याळ्याबाबत काही गंभीर आरोप केले आहेत. याच पार्श्वभूमीवर या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेमध्ये सोमैया नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणावर आज होणार सुनावणी
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणावर आज रायगड न्यायालयात सुनावणी होणार आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी जेष्ठ संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर देखील आरोप करण्यात आले आहेत.
नागपूरमध्ये आजापासून दोन दिवस कडक संचारबंदी
नागपूरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात शनिवार आणि रविवार असे दोन दिवस कडक संचारबंदीचे आदेश महापालिका आयुक्तांकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे आज नागपूरमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद राहणात आहेत.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर
राष्ट्रपती रामनाथ कोविंद आजपासून दोन दिवसांच्या मध्य प्रदेश दौऱ्यावर असणार आहेत. ते जबलपूरमध्ये मध्य प्रदेश न्यायिक अकादमीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आज दिल्ली दौऱ्यावर
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत, ते दिल्लीत उद्योजकांच्या बैठकीमध्ये सहभागी होणार असून, उद्योजकांशी चर्चा करणार आहेत. तसेच झारखंडमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक व्हावी यासाठी ते उद्योजकांना आवाहन देखील करणार आहेत.
शेतकरी आंदोलन, आज केएमपी एक्स्प्रेसवेवर रास्तारोको
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आज 100 दिवस पूर्ण झाले आहेत. आंदोलनाला 100 दिवस पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज आंदोलकांकडून केएमपी एक्स्प्रेसवेवर 5 तास रास्तारोको करण्यात येणार आहे.
आज भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीचा तिसरा दिवस
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर गुरुवारपासून भारत आणि इंग्लंडमध्ये चौथा आणि शेवटचा सामना खेळला जात आहे. गुरुवारी भारतीय फिरकीपुढे इंग्लंडचा पहिला डाव २०५ धावांवर आटोपला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या भारताने, दुसऱ्या दिवशी शुक्रवारी रिषभ पंतच्या शतकाच्या जोरावर 7 बाद 294 धावा बनवल्या आहेत. सध्या भारताकडे 89 धावांची आघाडी असून, आज तिसऱ्या दिवशी भारत या आघाडीमध्ये किती धावांची भर घालतो हो पाहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.