कौशांबी (उत्तर प्रदेश) Mobile Tower Stolen : आतापर्यंत तुम्ही मोबाईल चोरीच्या अनेक घटना ऐकल्या असतील. मात्र आता उत्तर प्रदेशच्या कौशांबी जिल्ह्यात एक विचित्र घटना घडली आहे. येथील एका गावातून काही अज्ञात चोरट्यांनी चक्क मोबाईल टॉवरच चोरून नेला! या चोरट्यांनी मोबाईल टॉवरची संपूर्ण उपकरणं आणि सेटअप पळवून नेला. घटनेच्या ९ महिन्यांनंतर कंपनीनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
टॉवरच गायब : हे प्रकरण संदीपान घाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उजीहनी गावातील आहे. गावातील उबेद उल्लाह यांच्या जमिनीवर मोबाईल टॉवर बसवण्यात आला होता. राजेश यादव हे जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीत तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी ३१ मार्च रोजी येथे भेट दिली तेव्हा त्यांना जमिनीवर बसवलेल्या टॉवरची संपूर्ण रचना आणि सेटअप गायब असल्याचं आढळलं.
पोलीस ठाण्यात तक्रार दाखल : जागेच्या मालकाकडे याबाबत चौकशी केली असता त्यानं या प्रकरणाची कोणतीही माहिती नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं. यानंतर कंपनीच्या अभियंत्यानं चोरीच्या घटनेबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. कौशांबीच्या विविध भागात कंपनीचे अनेक टॉवर्स बसवण्यात आले आहेत. मात्र आता संपूर्ण टॉवरच गायब झाल्यानं कंपनीचे अधिकारी हैराण आहेत. पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाची नोंद करून तपास सुरू केला.
९ महिन्यानंतर तक्रार दाखल : राजेश यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या कंपनीनं खासगी कंपन्यांच्या मोबाइल सिग्नल फ्रिक्वेन्सीसाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी १६ मोबाइल टॉवर बसवले आहेत. एका टॉवरची आणि संपूर्ण सेटअपची किंमत सुमारे ८,५२,०२५ रुपये आणि WDV (सेटअप) ची किंमत ४,२६,८१८ रुपये आहे. राजेश यादव यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी टॉवर चोरीची माहिती कंपनीला पाठवली. कारवाईसाठी ९ महिने लागले. कंपनीच्या सूचनेवरून त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
प्रकरणाचा तपास सुरू : या प्रकरणी पोलीस ठाण्याचे प्रभारी भुवनेश चौबे यांनी सांगितलं की, पोलीस स्टेशनला जीटीएल कंपनीच्या कर्मचाऱ्याचा अर्ज आला आहे. घटनास्थळी तपास केला असता मोबाईल टॉवर आणि संपूर्ण सेटअप गायब असल्याचं आढळून आलं. तक्रारीच्या आधारे अज्ञात व्यक्तींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
हेही वाचा :