हैदराबाद - भारतातील अॅक्टिव्ह कोविड रुग्णांची संख्या ही एकूण संख्येच्या तुलनेने ६ टक्के घसरली आहे, अशी माहिती काल केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली. कोरोनाविरुद्धच्या लढाईतील हे खूप मोठे यश असल्याची प्रतिक्रिया आरोग्य मंत्रालयाने आपल्या ट्विटमधून दिली आहे.
पीफाईझर या औषध निर्मिती कंपनीने स्व:निर्मित बीएनटी १६२ बी २ ही औषध कोरोनावर प्रभावी असल्याची घोषणा केली होती. त्यावर प्रश्न केला असता, कोविड व्यवस्थापनातील राष्ट्रीय तज्ज्ञ पथक हा सगळ्या औषध निर्मिती कंपन्यांशी चर्चा करत असून, आम्ही औषधीची स्थिती, तिची नियामक मान्यता आणि गरजेवर लक्ष देतो. अशी प्रतिक्रिया केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भुषण यांनी दिली.
दरम्यान, भारतात कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही ८५ लाख ९१ हजार ७३० इतकी आहे. त्यातील १ लाख २७ हजार ५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर ७९ लाख ५९ हजार ४०६ नागरिक बरे झाले आहेत. सध्या देशात ५ लाख ५ हजार २६५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत.
मुंबई - राज्यात काल १० हजार ७६९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आजपर्यंत एकूण १५ लाख ८८ हजार ९१ कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.९६ टक्के एवढे झाले आहे. तर, आज राज्यात ३ हजार ७९१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ४६ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४५ हजार ४३५ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे. अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
दरम्यान, दिवाळी नंतर बृहन्मुंबई महानगरपालिका शहरात अतिरिक्त मार्शल्सची नियुक्ती करणार आहे. शहरात गर्दी थांबवणे आणि नागरिकांनी मास्क घातले की नाही, याकडे लक्ष देण्याचे कार्य ते करतील.
दिल्ली - सर्व रॅपिड अँटिजेन डिटेक्शन टेस्टिंग केंद्र आणि आरटीपीसीआर सॅम्पल कलेक्शन केंद्रांनी चाचणी किंवा सॅम्पल गोळा करण्यासाठी आलेल्यांची ऑक्सिजन सॅच्यूरेशन तपासावी, आणि तिची नोंद ओपीडी स्लिपवर करावी, असे आदेश दिल्ली सरकारने केले आहेत.
तामिळनाडू - राज्यातील सिनेमागृहे काल सुरू झालीत. कोरोनामुळे मार्च महिन्यात राज्यातील सिनेमागृहे बंद करण्यात आली होती.
पंजाब - राज्यातील कंटेन्मेंट झोन बाहेरील हॉटेल्स, मॉल्स, आणि मल्टिप्लेक्समधील बार्स सुरू करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे.
हेही वाचा- बंगळुरूतील केमिकल फॅक्टरीला भीषण आग; बाजूची वाहनेही जळून खाक