पाटणा - बिहार विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या आज (शुक्रवार) शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करताना सत्ताधारी पक्षावर जोरदार हल्ला चढविला. यावेळी त्यांनी सत्ताधारी पक्षाला 'चोर आणि बेईमान' असे संबोधले. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर तेजस्वी यांनी खालच्या पातळीवरील टीका केली.
हे सरकार चोर दरवाजातून पुढे आले
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत भाग घेताना तेजस्वी यादव बोलत होते. त्यानंतर सत्ताधारी पक्षाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येऊन गोंधळ घातला गेला. तेजस्वी म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत जनादेशाची चोरी झाली आहे. हे सरकार चोर दरवाजातून पुढे आले आहे. या दरम्यान झालेल्या गदारोळातच त्यांनी सत्ताधारी पक्षाला चोर, बेईमान, असे संबोधले. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचा पक्ष तिसर्या क्रमांकावर गेला आहे. निवडणूक प्रचारादरम्यान नितीशकुमार यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले.
यावर बिहारचे उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांनी आक्षेप घेत अध्यक्ष महोदयांना सांगितले की, हे सरकार संवैधानिक मार्गाने सत्तेवर आलेले आहे. त्याला चोर मार्गाने आलेले सरकार म्हणणे हा सदनाचा अपमान आहे. त्यावर अध्यक्षांनी तेजस्वी यादव यांच्या आक्षेपार्ह बाबी सभागृह कार्यवाहीतून हटवण्याचे निर्देश दिले.