दिंडोरी : शेतकऱ्यांनी कोरोनाची लस घ्यावी यासाठी लसीकरण मोहिमेची जबाबदारी असलेल्या शिक्षकांनी शेतकऱ्यांच्या शेतात धानाची लागवड केल्याची स्तुत्य घटना मध्य प्रदेशातील दिंडोरीमधील शहापुरा तालुक्यातील मानिकपूरमधून समोर आली आहे. कोरोना लसीकरणासाठी अशा प्रकारे शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणाऱ्या शिक्षकांचे आता सर्व स्तरातून कौतुक होताना दिसत आहे.
धान लागवडीत व्यस्त असल्याने शेतकरी लसीकरणासाठी आले नाही
याविषयी सविस्तर वृत्त असे की, मध्य प्रदेशातील मानिकपूर येथे लसीकरण मोहिमेदरम्यान शनिवारी दुपारी एक वाजेपर्यंत एकही व्यक्ती लसीकरणासाठी केंद्रावर आला नाही. यानंतर लसीकरणाची जबाबदारी असलेल्या पथकाने गावात जाऊन विचारपूस केली असता शेतकरी धानाची लागवड करण्यात व्यस्त असल्याची माहिती त्यांना मिळाली. यानंतर लसीकरण मोहिमेतील शिक्षक कर्मचारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पोहोचले.
आम्ही धान लावतो, तुम्ही लस घ्या
शेतकऱ्यांच्या शेतात गेल्यानंतर शिक्षकांनी त्यांना लसीकरणासाठी येण्याची विनंती केली. यावेळी शेतकऱ्यांनी धानाच्या लागवडीची वेळ महत्वाचे असल्याचे त्यांना सांगितले. हे ऐकल्यानंतर या शिक्षक कर्मचाऱ्यांनी तुमच्याऐवजी आम्ही धान लावतो, मात्र तुम्ही लस घेऊन या असे त्यांना सांगितले. तेव्हा शेतकरी लसीकरणासाठी तयार झाले.
लसीकरण पथकाचे होतेय कौतुक
लसीकरण मोहिमेतील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या या पुढाकारामुळे शंभर टक्के लसीकरणाचे ध्येय पूर्ण झाल्याचे सीएमएचओ रमेश कुमार यांनी सांगितले. प्राथमिक शाळेतील शिक्षिका रजनी झरियांनी दिलेल्या माहितीनुसार 33 नागरिकांचा लसीचा दुसरा डोस बाकी होता. मात्र दुपारपर्यंत एकही व्यक्ती लसीकरणासाठी केंद्रावर आला नव्हता. यानंतर लसीकरण पथकातील महिला शिक्षक पार्वती परसते, शिक्षक हरी सिंह परस्ते आणि स्वतः रजनी झरियांनी शेतकऱ्यांच्या शेतात धान लागवडीचा निर्णय घेत त्यांना लसीकरणासाठी पाठविले. यामुळे लसीकरणाचे ध्येय गाठण्यास मदत झाली.
हेही वाचा - WORLD LION DAY : 'गीर' सिंहांची आशियातील सर्वात सुरक्षित भूमी