नवी दिल्ली : २६ जानेवारीच्या ट्रॅक्टर परेडवेळी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारातील आरोपी सुखदेव सिंग याला दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रांचने पंजाबमध्ये अटक केली आहे. ट्रॅक्टर परेडवेळी झालेल्या हिंसाचारानंतर सुखदेव फरार झाला होता.
सुखदेववर होते ५० हजारांचे बक्षीस..
दिल्ली पोलिसांनी सुखदेववर ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. क्राईम ब्रांचचे एक पथक सातत्याने त्याचा शोध घेत होते. यावेळी सुखदेव हा पंजाबमध्ये लपला असल्याची माहिती मिळताच, पथकाने कारवाई करत सुखदेवला अटक केली.
१४ गुन्ह्यांचा तपास सुरू..
दिल्लीमध्ये ट्रॅक्टर परेडमध्ये झालेल्या सुमारे १४ हिंसाचाराच्या घटनांचा क्राईम ब्रांच तपास करत आहे. आतापर्यंत याप्रकरणी ४४हून अधिक गुन्हे दाखल झाले असून, १२४हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. या ४४ पैकी १४ प्रकरणांचा तपास क्राईम ब्रांच करत आहे. तसेच, दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत ७० हून अधिक लोकांची छायाचित्रेही प्रसिद्ध केली आहेत.
ट्रॅक्टर परेडच्या वेळी झाला होता हिंसाचार..
केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांनी प्रजासत्ताक दिनी दिल्लीमध्ये ट्रॅक्टर परेडचे आयोजन केले होते. सुरुवातीला शांततेत सुरू असलेल्या या परेडला दुपारनंतर मात्र गालबोट लागले. शहरात ठिकठिकाणी आंदोलकांनी बॅरिकेट्स तोडत हिंसाचार सुरू केला. त्यातच काही आंदोलकांनी लाल किल्ल्यावर चढत, तेथे आपला झेंडाही फडकवला होता.