नवी दिल्ली : दिल्लीच्या कापसहेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वाल्मिकी कॉलनीमध्ये आज (गुरुवार) सकाळी मोठी दुर्घटना घडली. एका घरात सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे तब्बल सहा लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जिल्ह्याचे पोलीस उपायुक्त इंगित प्रताप सिंह यांनी सांगितले, की या स्फोटानंतर फ्लायओव्हरच्या खाली आणि शेतात असलेल्या दोन-तीन झोपड्यांनाही आग लागली होती.
या आगीत एकाच कुटुंबातील सहा लोकांचा मृत्यू झाला. कमलेश (३७) आणि त्यांची पत्नी बुधनी (३२) या दाम्पत्यासह त्यांच्या चार मुलांचा यात समावेश आहे. चार मुलांमध्ये १६ आणि १२ वर्षांच्या दोन मुली, तसेच सहा वर्षाचा आणि तीन महिन्यांच्या मुलाचा समावेश आहे.
या सर्व मृतदेहांना सफदरगंज रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहे. तसेच अग्नीशामक दलाच्या गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
हेही वाचा : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना कोरोनाची लागण