मुंबई - बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आल्याचे वृत्त आहे. सलमानच्या वैयक्तिक सुरक्षेशिवाय, पोलिसांनी सलमान खानच्या घराभोवतीही कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. जेणेकरून कोणतीही अनुचित घटना अगोदरच टाळता येईल. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात आली आहे.
वास्तविक, सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे नाव समोर आले आहे. या हत्येप्रकरणी लॉरेन्स बिश्नोईचीही चौकशी सुरू झाली आहे. लॉरेन्स बिश्नोई हा तोच गुंड आहे ज्याने (2018)मध्ये सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. अशा परिस्थितीत ही टोळी पुन्हा सक्रीय होत असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सलमानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
वास्तविक, सलमान खानच्या काळवीट शिकार प्रकरणाची सुनावणी अजूनही सुरू आहे. याबाबत निर्णय होणे बाकी आहे. याप्रकरणी लॉरेन्स बिश्नोईने जोधपूरमध्ये सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतरही त्याची सुरक्षा खूप वाढवण्यात आली होती आणि आता पुन्हा एकदा सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
सुरुवातीच्या तपासात असे बोलले जात आहे की, सिद्धू मुसेवाला यांचा मृत्यूही टोळीयुद्धामुळे झाला असून तिहार जेलपासून कॅनडापर्यंत त्यांच्या मृत्यूचे कनेक्शन आहे. तिहार तुरुंगात उपस्थित असलेल्या लॉरेन्स बिश्नोईने या हत्येचा कट रचला होता आणि त्याच्या साथीदारांच्या मदतीने तो अंमलात आणला होता. निशस्त्र आणि बुलेट प्रूफ कारशिवाय बाहेर पडलेल्या सिद्धू मुसेवाला यांना गोळ्या घालून ठार करण्यात आले.
हेही वाचा - लखीमपूर हिंसाचाराच्या साक्षीदारावर गोळीबार; प्रियंका गांधीची योगी सरकारवर टीका