चेन्नई - काँग्रेस नेता राहुल गांधी तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी थुथुकीडीमधील व्हीओसी कॉलेजमध्ये संबोधीत केले. गेल्या सहा वर्षात संस्था आणि देशाला एकत्र ठेवणाऱ्या स्वतंत्र पत्रकारीतेवर पद्धतशीर हल्ला झाला आहे. लोकशाही एका झटक्यात मरत नाही, हळूहळू मरते. आरएसएसने (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) संस्थात्मक संतुलन नष्ट केले आहे, असे ते म्हणाले.
विकसित देशांनी ईव्हीएम नाकारले आहे. ईव्हीएम मशीन शंभर टक्के सुरक्षित आहे, यावर माझा विश्वास नाही. ईव्हीएममध्ये समस्या आहेत, असे राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी पाच जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. यात त्यांनी तमिळनाडूचे समुद्रीद्वार समजल्या जाणार्या अति प्राचीन तुतीकोरीन किंवा टुटुकुडी, विरुदनगर, तिरुनलवेली, तिनकासी व कन्याकुमारीचा समावेश आहे. माहितीनुसार, राहुल गांधी रॅली, रोड शो आणि विविध गटांची भेट घेतील.
तसेच राहुल गांधी महिला, विशेषत: बचत गट, मच्छीमार, शेतकरी, विद्यार्थी आणि पंचायत संघटनेशी संबंधित लोकांशी संवाद साधतील. या जिल्ह्यात शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमारांची संख्या चांगली आहे.
तामिळनाडू विधानसभा निवडणूक -
केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत तामिळनाडूमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. तामिळनाडू राज्याचे राजकारण वेगळ्याच धाटणीचे आहे. गेल्या तीन दशकांमध्ये राज्यात फक्त प्रादेशिक पक्षांची चलती असून, राष्ट्रीय पक्षांना प्रादेशिक पक्षांच्या कुबडय़ा घेऊन राजकारण करावे लागते. तामिळनाडूत 234 जागांसाठी एकाच टप्प्यात 6 एप्रिलला मतदान होणार आहे. तर निकाल 2 मे रोजी लागेल. तामिळनाडूत सत्ता बनविण्यासाठी 118 चा जादूई आकडा आहे.