नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि तिरुवनंतपुरमचे खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढू शकतात. शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या गूढ मृत्यूप्रकरणी दिल्ली पोलिसांनी उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. (review petition against Shashi Tharoor). या आधी, ऑगस्ट 2021 मध्ये राऊस एव्हेन्यू कोर्टाने थरूर यांची या प्रकरणात निर्दोष मुक्तता केली होती. 15 महिन्यांनंतर दिल्ली पोलिसांनी या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.(Sunanda Pushkar death case)
प्रकरण 7 फेब्रुवारी 2023 ला सूचीबद्ध : शशी थरूर यांच्या वतीने न्यायालयात उपस्थित असलेले ज्येष्ठ वकील विकास पाहवा यांनी दिल्लीहून दाखल करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिकेवर आक्षेप घेतला. त्यांच्या आक्षेपावर उच्च न्यायालयाने याप्रकरणी दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे. यासोबतच दिल्ली पोलिसांनी कोर्टात फेरविचार याचिका उशिरा दाखल केल्याबद्दल माफीचा अर्जही दाखल केला आहे. न्यायालयाने हे प्रकरण 7 फेब्रुवारी 2023 ला सूचीबद्ध केले आहे.
2014 मध्ये झाला होता मृत्यू : थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर 17 जानेवारी 2014 रोजी दिल्लीतील एका आलिशान हॉटेलच्या सूटमध्ये मृतावस्थेत आढळल्या होत्या. दिल्ली पोलिसांनी सुरुवातीला 1 जानेवारी 2015 रोजी अज्ञात व्यक्तींविरुद्ध हत्येच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवला होता. त्यानंतर शशी थरूर यांच्यावर आयपीसी कलम ४९८अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. 31 ऑगस्ट 2019 रोजी, दिल्ली पोलिसांनी दिल्ली न्यायालयाला थरूर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल किंवा पर्यायीपणे त्यांच्यावर हत्येचा आरोप ठेवण्यास सांगितले. यानंतर, ऑगस्ट 2021 मध्ये, राऊस एव्हेन्यू येथील ट्रायल कोर्टाने थरूर यांना त्यांच्या पत्नीच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्त केले. ट्रायल कोर्टाने खासदाराविरुद्ध पुरावे नसल्याचे म्हटले होते.