नागपूर Rahul Gandhi : नागपुरात आयोजित काँग्रेसच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात खासदार राहुल गांधी यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, देशात दोन विचारधारांमध्ये लढा सुरू आहे. खुद्द भाजपामधील नेतेही चिंतेत असल्याचा दावा राहुल यांनी केला. भाजपा नेहमीच गुलामगिरीवर चालणारा पक्ष असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
दोन विचारधारांची लढाई : काँग्रेसच्या 139 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित 'है तैयार हम' रॅलीत बोलताना काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले की, आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दिक्षाभूमीत येऊन मला खूप आनंद होत आहे. आज काँग्रेसचा स्थापना दिवस असून आम्ही नागपुरात तुमच्याशी बोलण्यासाठी आलो आहोत. "देशात विचारधारेचा लढा सुरू आहे, लोकांना वाटतं की, ही राजकीय लढाई आहे. बरोबर आहे, पण या लढ्याचा पाया, एक विचारधारा आहे. अनेक पक्ष NDA आणि INDIA युतीत सहभागी आहेत. पण लढा दोन विचारसरणींमध्ये आहे."
भाजपामध्ये 'गुलामी' : पुढं बोलताना राहुल गांधी म्हणाले की, "काँग्रेसमध्ये असलेल्या एका भाजपाच्या माजी खासदारानं मला सांगितलं की, भाजपामध्ये 'गुलामी' आहे." प्रसारमाध्यमांवर निशाणा साधण्याबरोबरच राहुल गांधी म्हणाले की, सध्याच्या युगात कुलगुरूंची नियुक्ती गुणवत्तेच्या आधारावर होत नाही, तर त्यांची निवड विशिष्ट संस्थेशी संबंधित असल्यानं करण्यात येत आहे.
संघानं, भाजपानं काय केलं : यावेळी राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयं सेवक संघ, भाजपावर सडकून टीका केली. संघ भाजपावर निशाणा साधत राहुल गांधी म्हणाले की, आज हे लोक तिरंग्याला सलाम करतात. पण वर्षानुवर्षे त्यांनी तिरंग्याला सलामी दिली नाही. मतदानाच्या अधिकाराबाबत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, संविधान भारतातील प्रत्येक नागरिकाला एक मत देण्याचा अधिकार देतं. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू तुरुंगात गेले. आंबेडकरांनी वर्षानुवर्षे संघर्ष केला, मात्र भाजपा, तसंच संघानं काय केलं, असा प्रश्न त्यांनी यावेळी केला.
स्वातंत्र्याचा लढा जनतेनं लढला : आमची विचारधारा सांगते, की देशाचा लगाम भारतीय जनतेच्या हातात असला पाहिजे. पूर्वीचे राजे जसा कारभार चालवत असत तसा देश चालवता कामा नये. आपण लोकशाहीबद्दल बोलतो. स्वातंत्र्याचा लढा कोणत्याही, राजे-सम्राटांनी लढला नाही, तर देशातील जनतेनं लढला. राजे-सम्राटांची इंग्रजांशी भागीदारी होती. स्वातंत्र्याचा लढा इंग्रज,राजे-सम्राट या दोघांविरुद्ध होता. काँग्रेस पक्ष गरीब जनतेसाठी लढत असल्याचं देखील राहुल गांधी म्हणाले.
हेही वाचा -