नवी दिल्ली - काँग्रेस नेता राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून इंधन दरवाढ, अर्थव्यवस्था, कृषी आंदोलन आशा मुद्यावरून केंद्राला लक्ष्य करत आहेत. आज त्यांनी खासगीकरणावरून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून मोदी सरकारवर, 'हम दो..हमारे दो' अशी घोषणाबाजी करत हल्लाबोल करत आहेत.
मोदींना फक्त ‘हमारे दो’ (अदानी-अंबानी) यांचेच कल्याण करायचे आहे. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमही त्यांचेच आणि विकासही त्यांचाच, मग जनतेसाठी काय आहे, असे सवाल राहुल गांधी यांनी टि्वट केला आहे. यासोबत त्यांनी एका बातमीचा फोटो आपल्या टि्वटमध्ये जोडला आहे. चार मुख्य क्षेत्रांना सोडून बाकी सर्व सरकारी कंपन्या विकण्यात येणार असल्याचे ते वृत्त आहे.
यापूर्वीही राहुल गांधी यांनी गुजरातमधील मोटेरा येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडीयमचे नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडीयम ठेवल्यावरून मोदींवर टीका केली होती. सत्य कसे सुंदरतेने बाहेर येते. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये अदानी एन्ड आणि रिलायन्स एन्ड आहेत. याचे अध्यक्ष जय शाह आहेत, असे टि्वट राहुल गांधींनी केले आहे. तसेच' हम दो हमारे दो' हा हॅशटॅग त्यांनी टि्वट केला आहे. मोदी सरकार हे अदानी आणि अंबानी यांना झुकतं माप देतातं, असाही आरोपी त्यांनी केला.
सरकारचा खाजगीकरणावर भर -
सार्वजनिक क्षेत्रातील जवळपास सर्व कंपन्यांचे खासगीकरणाचे सूतोवाच मोदींनी केले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील निम्म्याहून अधिक बँकांचे खासगीकरण करण्याचा विचार सरकारने केला आहे. व्यवसाय करणे हे सरकारचे काम नव्हे. करदात्यांच्या पैशांवर तोट्यात असणारे उद्योग सांभाळण्यापेक्षा त्या पैशाचा वापर कल्याणकारी योजनांसाठी वापरता येईल,’ असे प्रतिपादन मोदींनी केले होते.