नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केलीय. निवडणुका जवळ आल्याने खासदार राहुल गांधी लोकांमध्ये जाऊन त्यांच्या भेटी घेत आहेत. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी ट्रकमध्ये प्रवास करताना दिसले होते. तर गेल्या महिन्यात त्यांचा शेती करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता राहुल गांधी एका वेगळ्याच अवतारात दिसले आहेत. आता ते लडाखमध्ये चक्क स्पोर्ट्स बाईक चालवताना दिसले.
लेह शहरातून पॅंगॉन्ग लेकपर्यंत बाईकवरुन प्रवास : राहुल गांधी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केलाय. त्यामध्ये ते लडाखच्या रस्त्यावर बाईक चालवताना दिसतायेत. त्यांनी त्यांच्या KTM 390 ड्यूक मोटारसायकलने लेह शहरातून प्रसिद्ध पॅंगॉन्ग लेकपर्यंत प्रवास केला. या पोस्टवर त्यांनी एक कॅप्शन लिहिले आहे, 'माझे वडील म्हणायचे की हे जगातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे'.
धूम 4 च्या हिरोची उपमा : राहुल गांधी यांच्या या फोटोवर अनेक कमेंट्स आल्या आहेत. एका यूजरने तर त्यांना चक्क चित्रपटाच्या हिरोची उपमा दिली. 'आता आम्हाला धूम 4 चा खरा हिरो सापडला आहे', असे या यूजरने म्हटले. या वर्षाच्या सुरुवातीला राहुल गांधी यांनी राजधानी दिल्लीतील करोल बाग बाईक मार्केटला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी त्यांच्याकडे केटीएम ड्यूक 390 ही स्पोर्ट्स बाईक असल्याचे सांगितले होते. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव ते तिला क्वचितच चालवतात, असे ते म्हणाले होते.
राहुल गांधी लडाखच्या दौऱ्यावर : राहुल गांधी सध्या लेह-लडाखच्या दौऱ्यावर आहेत. २५ ऑगस्टपर्यंत ते लडाखमध्ये असतील. गुरुवारी दुपारी ते लेहला पोहोचले. तिथे त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. शुक्रवारी त्यांनी लेहमधील तरुणांशी संवाद साधला. तेथे त्यांनी एका फुटबॉल सामन्यातही भाग घेतला. रविवारी, ते त्यांचे दिवंगत वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना पॅंगोंग तलावावर श्रद्धांजली अर्पण करतील. यानंतर राहुल गांधी कारगिलला जातील. तेथे ते जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.
हेही वाचा :