नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोनाने थैमान घातल्याने जागतीक आरोग्य धोक्यात आले होते. गेल्या वर्षभरापासून कोरोना लसीच्या प्रतिक्षेत असलेल्या भारताच्या नागरिकांना अखेर दिलासा मिळला आहे. अखेर भारतामध्ये कोरोना लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. यातच कोरोना लसीच्या साईड इफेक्ट्सवरून आणि प्रभावीपणावरून अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्याचप्रमाणे नागरिकांना लस टोचण्यापूर्वी राष्ट्र प्रमुखांनी लस घेतली नसल्याने विरोधकांनी मोदींवर टीकाही केली होती.
कोरोना विषाणूविरूद्ध लसीकरण प्रक्रिया देशभर सुरू आहे. सरकारने पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबरच कोरोना योद्ध्यांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या अंमलबजावणीला 16 जानेवारीपासून सुरुवात करण्यात आली होती. आता याच अनुक्रमे लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व मुख्यमंत्री, आमदार आणि 50 वर्षांवरील नेत्यांना कोरोनाची लस दिली जाईल. सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
देशात कोरोना लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू आहे. यावेळी सात लाखाहून अधिक लोकांना लस देण्यात आली आहे. कोरोना लसीच्या दुसर्या टप्प्यात सैन्य, निमलष्करी दलाचे जवान आणि 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना ही लस दिली जाईल. तथापि, कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा कधी सुरू होईल, हे अद्याप समजू शकले नाही.
कोरोना लसीवर प्रश्न -
कोरोना लस घेतल्यानंतर कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना कर्नाटकातील बेलारी जिल्ह्यात घडली आहे. मृत्यू झालेला व्यक्ती सुंदूर येथील सरकारी रुग्णालयात चर्तुथ श्रेणी कर्मचारी होता. लस घेतल्यानंतर या कर्मचाऱ्याला दोन दिवस कोणताही त्रास झाला नव्हता. मात्र, त्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ४३ वर्षीय आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू लसीचा डोस घेतल्यामुळे नाही तर हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाल्याचे स्पष्टीकरण आरोग्य मंत्रालयाने दिलं होतं.
उत्तर प्रदेशातही कर्मचाऱ्याचा मृत्यू
कोरोना लस घेतल्यानंतर उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातही एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. या व्यक्तीचाही हृदविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांच्या पथकाने सांगितले आहे. कोरोना लस घेतल्यानंतर अद्याप देशात दोन जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मात्र, याचा लसीकरणाशी संबध नसल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.