नवी दिल्ली : केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात आज शेतकऱ्यांची ट्रॅक्टर परेड आयोजित करण्यात आली आहे. यासाठी दिल्लीच्या सीमांवर शेतकरी आंदोलकांची तयारी पूर्ण झाली असून, देशभरातील शेतकरी अजूनही दिल्लीच्या दिशेने कूच करत आहेत.
केंद्राने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकरी गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. आतापर्यंत शेतकरी आणि सरकारमध्ये तब्बल १२ वेळा चर्चा होऊनही यावर कोणताही तोडगा निघाला नाही. प्रजासत्ताक दिनापर्यंत हे कायदे मागे घेतले नाहीत, तर दिल्लीमध्ये ट्रॅक्टर परेडचे आयोजन करण्यात येईल असा इशारा शेतकरी संघटनांनी यापूर्वीच दिला होता. सरकारने आतापर्यंत झालेल्या चर्चांमध्ये कायद्यांमध्ये बदल करण्याबाबत, किंवा मग काही काळासाठी कायदे थांबवण्याबाबत सुचवले होते. तसेच, सर्वोच्च न्यायालयानेही सध्या या कायद्यांवर स्थगिती आणली आहे. मात्र, हे कायदे जोपर्यंत पूर्णपणे मागे घेतले जात नाहीत, तोपर्यंत आपले आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचे शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे.
हजारो शेतकरी होणार ट्रॅक्टर मोर्चामध्ये सहभागी..
आज होणाऱ्या ट्रॅक्टर मोर्चामध्ये देशभरातील हजारो शेतकरी सहभागी होणार आहेत. पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान यांसह इतर राज्यांमधील शेतकरीही या मोर्चासाठी दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वात पुढे आतापर्यंत या आंदोलनात बळी गेलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहणारा ट्रॅक्टर असेल. त्यामागे १६ राज्यांचे प्रतिनिधित्त्व करणारे ट्रॅक्टर असतील. या ट्रॅक्टरांच्या मागे हजारोंच्या संख्येत इतर ट्रॅक्टर असणार आहेत. सकाळी ९च्या सुमारास दिल्लीच्या तीन सीमांवरुन या मोर्चाला सुरुवात होईल.
हेही वाचा : सिंघू सीमेवर ५० हजारांहून अधिक शेतकरी ट्रॅक्टर रॅलीच्या तयारीत..
दिल्लीच्या तीन सीमांवर शेतकरी तयारीत..
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या तीन सीमांवर आंदोलक शेतकरी उपस्थित आहेत. सिंघू सीमा, टिकरी सीमा आणि गाझीपूर सीमा या तीन सीमांवर मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित आहेत. प्रजासत्ताकदिनी आयोजित करण्यात आलेल्या किसान परेडच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी शेतकरी संघटनांसोबत चर्चा केली होती. यामध्ये परेडसाठी तीन मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.
हे तीन मार्ग करण्यात आले निश्चित..
- सिंघू सीमेवरुन सुरू झालेली परेड संजय गांधी ट्रान्सपोर्ट नगर, कंझावला, बवाना, औचंदी सीमा या मार्गाने पुढे जात हरियाणामध्ये प्रवेश करेल.
- टिकरी सीमेवरुन सुरू झालेली परेड नांगलोई, नजफगढ आणि ढांसामार्गे पुढे जात केएमपीकडे रवाना होईल.
- गाझीपूर सीमेवरुन निघालेली परेड यूपी गेट, अप्सरा सीमा यामार्गे जात पुढे हापुड मार्गावर जाईल.
पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे आवाहन..
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शेतकऱ्यांना शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. या ट्रॅक्टर मोर्चामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात यावी, तसेच आपला सन्मान राखावा असेही ते यावेळी म्हणाले. यासोबतच, त्यांनी केंद्र सरकारलाही शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्याची विनंती केली आहे.
हेही वाचा : 'ट्रॅक्टर मोर्चा' हरियाणा सरकारने दिली परवानगी; शाहजहानपूर ते मानेसर निघणार रॅली