पाटणा : बिहारच्या पाटणा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. ब्रेन हॅमरेज झालेल्या एका रुग्णाला कोरोनामुळे मृत घोषित करत त्याचा मृतदेहही कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. मात्र, अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबीयांनी मृताचा चेहरा पाहिल्यावर हा दुसराच कोणतरी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर रुग्णालयात जाब विचारण्यासाठी गेले असता, ब्रेन हॅमरेज झालेला रुग्ण अजूनही रुग्णालयातच असल्याचे त्यांना समजले.
चुन्नु कुमार (४०) या रुग्णाला ९ एप्रिल रोजी ब्रेन हॅमरेजमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी सकाळी त्याच्या कुटुंबीयांना सांगण्यात आले, की त्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यानंतर कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेत अंत्यसंस्कारासाठी नेला. नियमानुसार मृतदेहाजवळ कोणालाही जायची परवानगी नाही. मात्र, कुटुंबीयांनी वारंवार विनंती केल्यानंतर पीपीई किटची चेन थोडी उघडून त्याचा चेहरा दाखवण्यात आला. मृतदेहाचा चेहरा पाहताच कुटुंबीयांच्या लक्षात आलं की हा दुसऱ्याच कोणत्या व्यक्तीचा मृतदेह आहे. त्यानंतर रुग्णालयात चौकशी केल्यावर चुन्नुवर अद्यापही उपचार सुरू असल्याचे त्यांना समजले.
रुग्ण कित्येक महिन्यांपासून बाहेरच गेला नाही, मग पॉझिटिव्ह कसा?
रुग्णालयाच्या या गलथान कारभारावर रुग्णाचे कुटुंबीय संतापले होते. कुमार यांच्या एका नातेवाईकाने सांगितले, की पायाला दुखापत झाल्यामुळे कित्येक महिन्यांपासून तो घराबाहेरच पडला नाही. आमच्या घरात किंवा गल्लीतही कोणाला कोरोना झाला नाही, मग त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह कसा? तर, कुमार यांच्या पत्नीने रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारावर नाराजी व्यक्त केली.
रुग्णाला भेटण्यासाठी, इतर गोष्टींसाठी मागितले जातात पैसे..
कुमार यांच्या नातेवाईकांनी रुग्णालय कर्मचाऱ्यांवर पैसे मागितल्याचा आरोपही केला आहे. ते म्हणाले, की प्रत्येक वेळी त्यांची काही मदत मागितल्यास ते पैशांची मागणी करत. रुग्णाचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी २०० रुपये, तसेच त्याच्या मृतदेहाचा चेहरा दाखवण्यासाठी २००० रुपयांची मागणी करण्यात आली. तसेच, रुग्णवाहिका चालकानेही मृतदेह नेण्यासाठी १,५०० रुपयांची मागणी केल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
दरम्यान, याप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे रुग्णालय अधीक्षक डॉ. आय. एस. ठाकूर यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : एका रुग्णाने केली मारहाण करत केली दुसऱ्याची हत्या; यूपीमधील घटना