नवी दिल्ली Parliament Special Session : संसदेचं पाच दिवसीय विशेष अधिवेशन आजपासून (सोमवार, १८ सप्टेंबर) सुरू होत आहे. पहिल्या दिवशी अधिवेशन जुन्या संसद भवनातच होईल. या दरम्यान खासदार जुन्या संसद भवनाच्या ७५ वर्षांच्या आठवणींना उजाळा देतील.
गणेश चतुर्थीच्या दिवशी नव्या संसद भवनात प्रवेश : १९ सप्टेंबरला गणेश चतुर्थीच्या दिवशी पूर्ण विधीपूर्वक पूजा केल्यानंतर जुन्या संसद भवनातून नवीन संसद भवनात प्रवेश केला जाईल. त्यानंतर औपचारिकपणे कामकाजाला सुरुवात होईल. यासाठी व्यापक तयारी करण्यात आली आहे. काल (रविवारी) जुन्या संसद भवनात ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संसदेची नवीन इमारत पूर्णपणे बदललेली दिसेल. इथे अनेक गोष्टी नव्या रंगात पाहायला मिळतील. अगदी कर्मचाऱ्यांचे पेहरावही बदललेले असतील.
पाच महत्त्वाची विधेयके सादर होणार : विशेष अधिवेशनादरम्यान संसदेत पाच मोठी विधेयके मांडली जाणार असल्याचं सांगण्यात येतय. यामध्ये प्रामुख्यानं पोस्ट ऑफिस विधेयक २०२३, तसेच मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीशी संबंधित विधेयकं मांडण्यात येणार आहेत. ही दोन्ही विधेयकं आधी राज्यसभेत मांडली जातील. त्यानंतर ती लोकसभेत मांडण्यात येतील. याशिवाय लोकसभेत अॅडव्होकेट्स अमेंडमेंट बिल २०२३ आणि प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पीरियॉडिकल बिल २०२३ सादर केले जातील. ही दोन्ही विधेयकं राज्यसभेत आधीच मंजूर झाली आहेत.
अधिवेशनासाठी एकूण ८ विधेयकं सुचीबद्ध केली : संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, विशेष अधिवेशनासाठी एकूण ८ विधेयकं सुचीबद्ध करण्यात आली आहेत. रविवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत सभागृहाच्या नेत्यांना सूचित करण्यात आलं की, ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणावरील विधेयक आणि SC/ST आदेशाशी संबंधित तीन विधेयकांचा अजेंड्यात समावेश करण्यात आला आहे.
नवीन संसद भवनाबद्दल जाणून घ्या : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १० डिसेंबर २०२० रोजी नवीन संसद भवनाची पायाभरणी केली होती. यावर्षी २८ मे रोजी याचं उद्घाटन झालं. संसदेचं नवं भवन ६४,५०० चौरस मीटर क्षेत्रफळावर बांधलं असून त्याच्या बांधकामासाठी ८६२ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. संसदेच्या नवीन इमारतीत लोकसभेच्या ८८८ खासदारांना तर राज्यसभेच्या ३८४ खासदारांना बसण्याची व्यवस्था आहे.
हेही वाचा :