नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिन व शेतकऱयांच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दिल्लीमध्ये कडक बंदोबस्त ठेवल्याचे दिल्ली पोलीस दलाचे विशेष पोलीस आयुक्त(गुप्तचर) दिपेंद्र पाठक यांनी सांगितले. नवीन कृषी रद्द करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. २६ जानेवारीपर्यंत आपल्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर दिल्लीपर्यंत ट्रॅक्टर रॅली आयोजित करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्यावतीने या रॅलीची जोरदार तयारी झाली आहे. शेतकऱ्यांप्रमाणेच दिल्ली पोलीस देखील बंदोबस्तासाठी तयारी करत आहेत.
पाकिस्तान शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याच्या तयारीत -
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये गोंधळ घालण्यासाठी पाकिस्तानमधून ३०० ट्विटर हॅन्डल्स तयार झाल्याचा दावा, दिपेंद्र पाठक यांनी केला आहे. शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी १३ ते १८ जानेवारीच्या काळात पाकिस्तानमध्ये हे ट्विटर हॅन्डल्स तयार करण्यात आले आहेत. आपल्या विविध गुप्तचर संस्थांनी ही माहिती दिल्याचे, पाठक यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांची मनधरणी सुरू -
दिल्ली पोलीस दलातील सर्व अधिकारी-कर्मचारी, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे जवान प्रजासत्ताक दिनी शांतता, कायदा व सुव्यवस्था ठेवण्याचा प्रयत्न करतील, अशी माहिती दिल्लीचे पोलीस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांनी दिली. शेतकऱ्यांनी रिंग रोडच्या ऐवजी दुसरीकडे ट्रॅक्टर रॅली काढावी, यासाठी शेतकरी संघटनांची मनधरणी सुरू असल्याचेही श्रीवास्तव यांनी सांगितले.
स्थगितीनंतरही आंदोलन सुरुच -
सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायद्यांना स्थगिती दिली असली, तरीही आमची मागणी कायदे रद्द करण्याची आहे, असे म्हणत शेतकरी संघटनांनी आपले आंदोलन सुरुच ठेवले आहे. जोपर्यंत कृषी कायदे रद्द केले जात नाहीत, आणि एमएसपी लागू होत नाही, तोपर्यंत आपले आंदोलन सुरुच राहणार असल्याचे शेतकरी संघटनांचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी स्पष्ट केले आहे.