फिरोजाबाद (उत्तरप्रदेश): रामनवमीच्या मुहूर्तावर देशाच्या अनेक भागात दोन समुदायांमध्ये वाद होत असतानाच उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये सामाजिक एकोप्याची एक अनोखी कहाणी समोर आली आहे. जिल्ह्यातील एका मुस्लिम कुटुंबाने त्यांच्या गावाबाहेरील मंदिरात वैदिक विधीनुसार हवन केले.
रामनवमीच्या दिवशी केला उपवास: यूपीच्या फिरोजाबाद जिल्ह्यात एकमेकांच्या परंपरेचा आदर करण्याची एक अद्भुत गोष्ट समोर आली आहे. रमजानचा पवित्र महिना सुरू असतानाच या काळात चैत्र नवरात्री आणि रामनवमी हे सण साजरे करण्यात आले. फिरोजाबादच्या सिरसागंज भागातील फतेहपूर कारखा रफिक मोहम्मद या गावातील कुटुंबाने रामनवमीच्या दिवशी उपवास करून देवीची पूजा केली. रफिक मोहम्मद यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, त्यांनी मनौती (नवस) मागितली होती जी पूर्ण झाली. या आनंदात त्यांनी पूजा केली.
पूजा करून नवस फेडला: रफिक मोहम्मदची आई हाफिजान बेगम यांनी सांगितले की, त्यांच्या मुलाने देवी मातेकडे नवस मागितला होता. नवस पूर्ण झाल्यावर देवीच्या मंदिरात जाऊन पूजा केली जाईल, असे वचन त्यांनी देवीला दिले होते. हिंदू परंपरेनुसार तो देवीला घंटा अर्पण करेल. त्यासोबतच प्रसादाचे वाटपही करण्यात येणार आहे. रफिक मोहम्मदच्या आईने सांगितले की, आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी रफिकने गुरुवारी रामनवमीच्या दिवशी गावाबाहेरील पाथवारी मंदिरात वैदिक मंत्रोच्चार करून मातेचे हवन केले.
सोशल मीडियावर पूजा व्हायरल: यासोबतच त्यांनी मंदिरात घंटाही अर्पण केली. रफिक मोहम्मद यांनी कुटुंबासमवेत हलुआ-चोऱ्याचा प्रसादही वाटला. रफिक म्हणतो की तो मुस्लिम नक्कीच आहे, पण प्रत्येक धर्माचा आदर करतो. सध्या रफिकची ही पूजा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बहुतेक लोक त्याच्या भावनांचा आदर करत आहेत. काल देशभरात रामनवमी साजरी होत असताना अनेक ठिकाणी रामनवमीच्या कार्यक्रमांमध्ये गोंधळ होऊन दंगलीचे प्रकारही घडले आहेत. या दंगलीच्या प्रकारांच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम कुटुंबाने हिंदू रितीरिवाजानुसार पूजा, हवन करून समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केल्याचे बोलले जात आहे.