तिरुवनंतपुरम (केरळ) - राज्यात कोरोना प्रकरणात वाढ होत आहे. मात्र तरीही राज्यात आठवडी लॉकडाऊन लावले जाणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे. राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली कोविड-कोअर समितीच्या बैठकीत यासंदर्भात हा निर्णय घेण्यात आला आहे. आढावा बैठका घेतल्या असून सध्या शनिवार व रविवार लॉकडाऊनच्या अंमलबजावणीची मागणी करण्यासारखी कोणतीही परिस्थिती नाही. दरम्यान राज्यात आजपासून नाइट कर्फ्यू लावला जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नाईट कर्फ्यू रात्री नऊ ते पहाटे ५ वाजेपर्यंत दोन आठवड्यांसाठी लावण्यात आला आहे. ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अंतर्गत कोरोना रुग्णांचे प्रमाण जास्त असेल तेथे कोविड चाचण्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या भागात घरोघरी जाऊन नागरिकांच्या चाचण्या करण्यात येणार आहे.
एर्नाकुलम आणि कोळीकोड जिल्ह्यात सर्वात जास्त पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढवले आहे. आरटी-पीसीआर चाचण्या करण्यांवर भर देण्यात येत आहे.
देशातही कोरोनाबाधितांच्या संख्येने उच्चांक नोंदवला आहे. गेल्या काही दिवसांपासून २ लाखांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली असून मृतांची संख्यादेखील वाढत आहे. दिल्लीमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याने एका आठवड्याचा कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. तर, महाराष्ट्रातही कडक निर्बंध लावण्यात आले असून लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे.