मुंबई - प्रजासत्ताक दिनाआधी झूम अॅपद्वारे 'पोएटिक जस्टीस फाऊंडेशन'च्या बैठकीला हजेरी लावल्याची कबुली निकिता जेकब यांनी दिली आहे. या बैठकीला खलिस्तानी समजल्या जाणाऱ्या पोएटिक जस्टीस फाऊंडेशन या संघटनेचे संस्थापक धालिवाल यांचीही उपस्थिती होती. ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणी मुंबईतील वकील निकिता जेकब यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांकडून अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले आहे. या विरोधात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून निकिता जेकबने उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पी. डी. नाईक यांच्यासमोर आज (मंगळवारी) सुनावणी झाली.
टुलकिट फक्त माहितीपर हिंसाचाराचा उद्देश नाही -
जेकब यांच्या वकिलांनी मुंबई पोलिसांकडे लेखी उत्तर जमा केले आहे. हे टुलकिट एक्स्टिंक्शन रिबेलियन (XR) इंडियाच्या स्वयंसेवकांनी तयार केले असून आंतरराष्ट्रीय स्तरावरील नागरिकांना शेतकरी आंदोलन सहजरित्या समजावे यासाठी तयार करण्यात आले होते, असा दावा जेकब यांनी दाखल केलेल्या उत्तरात केला आहे. बैठकीला हजेरी लावल्याचे त्यांनी मान्य केले असले तरी ग्रेटा थनबर्ग यांच्याबाबतची माहिती शेअर करण्यास नकार दिला. ही टुलकिट फक्त माहितीपर होते. त्याचा हिंसा पसरवण्याशी काहीही संबंध नव्हता, असा दावा त्यांनी केला आहे.
काय म्हटले आहे निकिता जेकब यांनी याचिकेत -
11 फेब्रुवारीला दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलकडून त्यांच्या घरी सर्च वॉरंटनुसार तपास झाला होते. यात त्यांची काही वैयक्तिक कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक वस्तू ताब्यात घेण्यात आल्या आहेत. याबरोबरच निकिता जेकब यांचा जबाबसुद्धा घेण्यात आल्याचे निकिता यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. मी पर्यावरण चळवळी संदर्भात स्वयंसेवक म्हणून काम करत आहेत. यामागे माझा कोणताही जातीय, राजकीय किंवा आर्थिक उद्देश नसल्याचा दावा निकिता जेकब यांनी केला आहे. काही सोशल माध्यमांवरील ट्रोलर्सकडून त्यांची वैयक्तिक माहिती, इमेल आयडी, फोननंबर सारख्या गोष्टी समाज माध्यमांवर पसरवल्या जात आहेत.
निकिता यांनी दावा केला आहे की त्यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांकडे गुन्हा नोंदवण्यात आल्याचे समाज माध्यमांवरूनच समजले. आतापर्यंत त्यांना यासंदर्भात कुठलीही कम्प्लेन्ट कॉपी मिळाली नसल्याचेही जेकब यांनी सांगितले आहे. अशा प्रकारच्या परिस्थितीत एका महिलेला दुसऱ्या राज्यात प्रवास करणे हे खूपच त्रासदायक होणार असून यासंदर्भात अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी जामीन देण्यात यावा म्हणून त्यांनी याचिका दाखल केली आहे.
काय आहेत आरोप -
शेतकरी आंदोलासंबंधी सोशल मीडियावरून पोस्ट करताना टूलकिटचा (toolkit) वापर झाल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने तपास सुरू केला आहे. या प्रकरणी सायबर सेलने बंगळुरातील एका २१ वर्षीय पर्यावरणवादी कार्यकर्तीला अटक केली आहे. दिशा रवी असे अटक केलेल्या तरुणीचे नाव आहे. स्वीडनमधील पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिनेही टूलकिटचा वापर केला होता. त्यामुळे याची जगभर चर्चा झाली होती.
दिशा रवीला दिल्ली न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यानंतर दिशाची सहकारी असलेली मुंबईतील वकील निकिता जेकब आणि शंतनू मुळूक यांच्या विरोधात दिल्लीत अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले आहे. यातील शंतनू हा बीडचा असून तो सध्या फरार आहे. शंतनूच्या शोधात दिल्ली पोलिसांनी शनिवारी रात्री बीडमध्ये जाऊन त्याच्या चाणक्यपुरी भागातील घरी वडील आणि कुटुंबियांची तीन तास चौकशी केली. त्यानंतर पथकाने त्याच्या वडिलांना घेऊन औरंगाबादच्या घरी देखील चौकशी केली.