सीकर (राजस्थान) - राष्ट्रीय तपास यंत्रणेने शुक्रवारी सकाळी सीकर जिल्ह्यातील दोन गावात छापे टाकले. ही छापेमारी विदेशी फंडींगच्याबाबतीत असू शकते, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र, राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी याबद्दल अधिक माहिती देण्यास नकार दिला. तसेच पोलिसांनादेखील या प्रकरणाची माहिती देण्यात आलेली नाही.
राष्ट्रीय तपास यंत्रणेची टीम शनिवारी सकाळी जिल्ह्यातील फतेहपुर भागातील रोलसाहबसर गावात पोहोचली. येथील एका घरावर छापा टाकण्यात आला. यावेळी स्थानिक पोलीस त्यांच्यासोबत होते. मात्र, त्यांना घरात जाऊ दिले गेले नाही. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी या घरात बराच वेळ चौकशी केली. त्यानंतर गोडिया छोटा गाव येथे त्यांनी छापेमारी केली.
हेही वाचा - 'एनआयए'च्या देशातील छापेमारीवर अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने व्यक्त केली नाराजी
विदेशी फंडींग आणि सोन्याच्या तस्करीचे असू शकते प्रकरण
राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली नाही. तसेच सीकर पोलिसांनीही माहिती देण्यात आली नाही. मात्र, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे प्रकरण सोन्याची तस्करी आणि विदेशी फंडींग संबंधित असू शकते. ज्या व्यक्तीच्या घरी तपास करण्यात आला तो व्यक्ती सऊदी अरबमध्ये राहत असल्याची माहिती समोर आली आहे.
दिल्लीतील सोने तस्करी प्रकरणी 'एनआयए'चे सांगलीतील खानापूर तालुक्यात छापे -
काही दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्यातल्या खानापूर तालुक्यामध्ये दिल्लीतील सोने तस्करी प्रकरणी एनआयएकडून छापे टाकण्यात आले होते. काही महिन्यांपूर्वी दिल्लीमध्ये 83 किलो सोने तस्करी करताना खानापूर-आटपाडी तालुक्यातल्या आठ जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर या तस्करी प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास एजन्सीकडे देण्यात आला होता. एनआयएकडून सांगली पोलिसांच्या मदतीने खानापूर तालुक्यातील जाधववाडी याठिकाणी छापा टाकत चौकशी करण्यात आली होती.
83 किलो सोन्याची बिस्किटे केली होती जप्त-
दोन महिन्यांपूर्वी दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर सोने तस्करीचा प्रकार उघडकीस आला होता. यावेळी 83 किलो सोन्याची बिस्किटे डीआरआयने (महसूल गुप्तचर संचालनालय) जप्त केली होती. या प्रकरणी अटक करण्यात आलेले आठ जण ही सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील असल्याचे समोर आले होते. रवीकिरण गायकवाड, पवन कुमार गायकवाड, योगेश हणमंत रुपनर, अभिजित बाबर, सद्दाम पटेल, अवधूत अरुण विभूते, सचिन आप्पासो हसबे, दिलीप लक्ष्मण पाटील या आरोपींची समावेश आहे. दरम्यान तपासामध्ये आसाम राज्यातील गुवाहाटीवरून बोगस आधारकार्डद्वारे प्रवास करून दिल्लीमध्ये आल्याचे धक्कादायक प्रकार समोर आल्याने, त्या तस्करीचा तपास हा राष्ट्रीय तपास एजन्सीकडे देण्यात आला होता. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्यावर युएपीए या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर या सोने तस्करी प्रकरणी "एनआयए" कडून सांगली जिल्ह्यामध्ये एक महिन्यापूर्वी दिघंची या ठिकाणी छापे टाकले होते. त्यानंतर खानापूर तालुक्यातल्या जाधववाडी याठिकाणी पुन्हा छापे टाकले होते.
हेही वाचा - दिल्ली सोने तस्करी प्रकरण : 'एनआयए'चे सांगलीतील खानापूर तालुक्यात छापे