- पंतप्रधान नरेंद्र मोदी टोकियो ऑलिम्पिकला जाणाऱ्या खेळाडूंशी साधणार संवाद
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज टोकियो ऑलिम्पिकसाठी जाणाऱ्या खेळाडूंशी बातचित करणार आहे. या दरम्यान, ते खेळाडूंना शुभेच्छा देणार आहेत. कोरोनामुळे ही बातचित व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे होणार आहे. मोदी सायंकाळी पाच वाजता खेळाडूंशी संवाद साधणार आहेत. दरम्यान टोकियो ऑलिम्पिकला २३ जुलैपासून सुरूवात होणार आहे.
- मुंडे समर्थकांची आज मुंबईत बैठक
केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारामध्ये डॉ. प्रीतम मुंडे यांना डावलल्याचा आरोप करत पंकजा मुंडे समर्थक, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद, नगरपालिका सदस्यांसह जवळपास ७५ पदाधिकाऱ्यांनी पदाचे राजीनामे दिले आहेत. यामुळे पंकजा मुंडे यांनी आज समर्थकांची मुंबईतील वरळी येथे बैठक बोलावली आहे.
- मुंबई, ठाण्यासह कोकणात आज अतिवृष्टीचा इशारा -
मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने सोमवारी मुंबईसह राज्याच्या अनेक भागात जोरदार पुनरागमन केले. आज मुंबई, ठाणे, पालघर जिह्याच्या काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.
- भाजपा आमदार आशिष शेलार यांची पत्रकार परिषद
भाजपा आमदार आशिष शेलार पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी वार्तालाप करणार आहेत. सोमवारी आशिष शेलार सांगलीमध्ये होते. त्यांनी महाविकास आघाडीवर कडाडून टीका केली होती. महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राला कोरोनाची राजधानी बनवली आहे. तर राज्यातील ठाकरे सरकार हे रक्त पिपासु भ्रष्टाचारी वृत्तीचे असल्याची जहरी टीका शेलार यांनी केली होती.
- आज मुंबईत पाणीपुरवठा बंद राहण्याची शक्यता
मुंबईत आज पाणीपुरवठा बंद राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबईतील काही उपनगरांत पाणी पुरवठा सुरळीत होण्यास तांत्रिक अडचणी येत आहेत. असे असल्याने मुंबईकरांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागू शकते.
- मंगळ-शुक्राची युती पाहण्याची आज संधी -
आज मंगळ आणि शुक्र ग्रहांची युती पाहण्याची संधी मिळणार आहे. आकाशाच्या पश्चिमेला दोन्ही ग्रह एकमेकांपासून केवळ अर्ध अंश असतील. सायंकाळी आकाशात ढगाळ वातावरण नसल्यास नुसत्या डोळ्यांनीही ही युती पाहता येईल.
- हिमाचल प्रदेशमध्ये ऑरेंज अलर्ट
हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे राज्यात ऑरेज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हिमाचलच्या कांगडा जिल्ह्यात जोरदार पावसामुळे पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. पर्यटन नगरी धर्मशालाच्या भागसूनाग परिसरात पाण्याच्या तेज प्रवाहामुळे रस्त्यावरील अनेक गाड्या वाहून गेल्या आहेत. नाल्यांना आलेल्या पुरामुळे हॉटेल आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
- राजेंद्र अर्लेकर हिमाचलच्या राज्यपालपदाचा पदभार स्विकारणार
हिमाचल प्रदेशचे २८ वे राज्यपाल म्हणून राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते आज राज्यपालपदाची शपथ घेतील.
- रमेश बैस आज रांचीत
झारखंडचे १०वे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते आज रांचीमध्ये दाखल होणार आहेत. बैस उद्या झारखंडच्या राज्यपालपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.
- झारखंडमध्ये आज राज्यस्तरीय वन महोत्सव
झारखंडमध्ये आज ७२ व्या राज्यस्तरीय वन महोत्सव साजरा केला जात आहे. या निमित्ताने आज संपूर्ण राज्यामध्ये ५ लाख झाडे लावण्यात येणार आहेत.