मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सकाळी नवी दिल्लीतील नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले आणि लोकसभेच्या दालनात ऐतिहासिक सेंगोलची स्थापना केली. यावर, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन न होणे हे दुःखद असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने म्हटले आहे. तर राष्ट्रपती मुर्मू यांच्याकडे दुर्लक्ष करून नवीन संसद भवनाचे उद्घाटन करणे परंपरा आणि नियमानुसार नाही, असे शिवसेनेने (यूबीटी) म्हटले आहे.
'हे लोकशाहीसाठी चांगले नाही' : शिवसेना नेते संजय राऊत यांनी पक्षाचे मुखपत्र 'सामना'मधील 'रोखठोक' या संपादकीयमध्ये म्हटले आहे की, 'राष्ट्रपती मुर्मू यांच्याकडे दुर्लक्ष करून नवीन संसद भवनाचे उद्घाटन परंपरा आणि नियमांनुसार नाही. ज्या प्रकारे संसदेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे, ते लोकशाहीसाठी चांगले नाही.' राऊत यांनी पुढे लिहिले की, 'भारताच्या राष्ट्रपतींना समारंभासाठी निमंत्रितही करण्यात आले नव्हते. त्यामुळेच 20 विरोधी पक्षांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.'
'संसद भवनासाठी अनावश्यक खर्च केला' : राज्यसभा सदस्य असलेल्या संजय राऊत यांनी सांगितले की, 'सध्याची इमारत चांगल्या स्थितीत असल्याने नवीन संसद भवनाची गरज नाही. त्यांनी 'सामना'त लिहिले की, 'इतिहास लक्षात ठेवेल की नवीन संसद भवनासाठी 20,000 कोटी रुपये अनावश्यकपणे खर्च करण्यात आले आणि त्याच्या उद्घाटनाच्या वेळी भारताच्या राष्ट्रपतींना निमंत्रितही करण्यात आले नाही.'
'राष्ट्रपतींना सन्मान द्यावा' : नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावर अनेक विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला असून, त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्राध्यक्ष म्हणून सन्मान द्यावा असा आग्रह धरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रॅस्टो यांनी ट्विट केले की, 'आपल्या देशात लोकशाही आहे, राजेशाही नाही. आपले राष्ट्रपती, आपल्या देशाचे घटनात्मक प्रमुख नवीन संसद भवनाचे उद्घाटन करत नसल्याचे पाहून दुःख झाले.'
हेही वाचा :
- Rahul Gandhi On Parliament Inauguration : नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला पंतप्रधान राज्याभिषेक समजतात : राहुल गांधी
- New Parliament Building : नवीन संसद भवन उद्घाटन सोहळा; मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीसांची हजेरी
- Yoga On Parliament Inauguration: नवीन संसद भवनाच्या उद्घाटनानिमित्त साधला अप्रतिम योग- पंडित ऋषी द्विवेदी