दंतेवाडा (छत्तीसगड) : छत्तीसगडच्या बस्तर भागात नक्षलवादी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आपली उपस्थिती नोंदवत आहेत. आज नक्षलवाद्यांनी दंतेवाडा जिल्ह्यात एक प्रवासी बस पेटवली. ही घटना जिल्ह्यातील मालेवाही भागात घडली आहे.
दंतेवाड्यात नक्षल्यांचा हिंसाचार : नक्षलवाद्यांनी नारायणपूरहून दंतेवाड्याकडे येणाऱ्या प्रवासी बसला मालेवाही बोडलीच्या जवळ आग लावली. नक्षलवाद्यांच्या विरोधामुळेच या रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली होती. मात्र पक्का रस्ता तयार झाल्यानंतर ही वाहतूक पुन्हा सुरू झाली होती. या रस्त्यामुळे ये - जा करणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय झाली होती. आता मात्र नक्षलवाद्यांनी येथे बस पेटवून पुन्हा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
नारायणपूरमध्येही गोंधळ घातला : नक्षलवाद्यांनी यापूर्वी नारायणपूरमध्येही गोंधळ घातला होता. नक्षलवाद्यांनी येथे भरदिवसा रस्ता बांधणी करत असलेली तीन वाहने जाळली होती. खोडगाव आंजरेल खदानीतील शाळा पारा येथे रस्ता बांधकामाचे काम सुरू होते. दरम्यान, नक्षलवाद्यांनी तेथे येऊन जाळपोळ केली. या जाळपोळीत एक ट्रॅक्टर, एक पिकअपसह मिक्सर मशीन जळून खाक झाले. तत्पूर्वी 17 मार्च रोजी नक्षलवाद्यांनी नारायणपूर येथील कुरुश्नर सोनपूर रोडवरील मोबाईल टॉवरच्या सोलर पॅनलला आग लावली होती. नक्षलवाद्यांनी घटनास्थळावर दोन ते तीन राऊंड गोळीबार करून तेथून पळ काढला होता.
नक्षली हल्ल्यांमध्ये वाढ : गेल्या काही दिवसांपासून छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्यात पुन्हा एकदा वाढ पाहायला मिळाली आहे. नक्षलवादी ठिकठिकाणी जाळपोळ करून गावकऱ्यांना मारहाण करत आहेत. 29 मार्च रोजी नक्षल्यांनी सुकमा येथे एका गावकऱ्याची धारदार शस्त्राने हत्या केली. नक्षल्यांना संशय होता की तो पोलिसांचा खबरी आहे. 29 मार्च रोजी नारायणपूरमध्येही अशाच प्रकारची घटना घडवून आणली होती. नक्षलवाद्यांनी येथील माजी सरपंच आणि भाजप नेत्याचा गळा दाबून हत्या केली होती.
हे ही वाचा : SARBAT KHALSA : सरबत खालसा म्हणजे काय, अमृतपाल सिंगने जत्थेदारांना बोलावण्याचे का केले आवाहन, वाचा पूर्ण इतिहास