हैदराबाद - दरवर्षी राष्ट्रीय कन्या दिन २४ जानेवारीला साजरा केला जातो. या दिवशी मुलींबाबत समाजात जनजागृती करण्यात येते. मुलगा आणि मुलीत पूर्वीपासून भेदभाव होत आला आहे. मात्र, आता २१ व्या शतकात आधुनिक समाजात दोघांनाही समान संधी, हक्क, अधिकार आणि विकासाच्या संधी मिळाव्या यासाठी प्रयत्न करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे.
कन्यांच्या विकसातील अडथळे -
राष्ट्रीय कन्या दिनी विविध जनजागृतीपर कार्यक्रमातून लोकांची समज वाढवण्याचा प्रयत्न होतो. सेव्ह द गर्ल चाईल्ड, लिंग गुणोत्तर, प्रत्येक मुलीसाठी सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण निर्मिती करणे, बालहत्या, बाल लैंगिक अत्याचार यांसारख्या असंख्य विषयांवर लक्ष वेधले जाते. आपल्या आजूबाजूला पाहिले तर मुलगा आणि मुलीमध्ये भेदभाव होताना सहज दिसते. सुशिक्षित समाजातही मुलींप्रती जागरुकता दिसत नाही. अशिक्षित, ग्रामिण भागातील स्थिती तर यापेक्षाही वाईट आहे. गर्भलिंग निदान करून अनेक बालिकांची हत्या होते. कितीही कठोर कायदे आले तरी चोरून लपून गर्भनिदान होते. मुलींना जर चांगले शिक्षण दिले तर पुढे जाऊन त्या स्वावलंबी होतील. पुरुषसत्ताक व्यवस्थेत मुलींच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होते. मात्र, आर्थिक स्वावलंबन हा सुद्धा एक मुक्तीचा मार्ग आहे. शिक्षणासोबत आरोग्याकडेही तितकेच लक्ष द्यायला हवे.
राष्ट्रीय कन्या दिन महिला आणि बालविकास मंत्रालयाने २००८ सालापासून साजरा करण्यास सुरूवात केली. दरवर्षी २४ जानेवारीला हा दिवस देशभरात साजरा केला जातो. मात्र, फक्त एक दिवस जनजागृती करून चालणार नाही. मुलगी वाचवा हे अभियान चालवण्याची वेळच आपल्यावर यायला नको, इथपर्यंतचा प्रवास आपल्याला करायचा आहे.
भारतातील लिंग भेदभाव -
महिला आणि पुरुष दोघांच्या समान सहभागाशिवाय मानवाचे अस्तित्व टिकवणे शक्य नाही. मानववंश पुढे नेण्यासाठी दोघांचीही महत्त्वाची भूमिका आहे. मात्र, पुरुषापेक्षा महिलांना कमी किंमत मिळते. जन्माला येण्याआधीच मुलीला गर्भात मारून टाकण्यात येते. मानवाचे अस्तित्व टिकवण्यासाठी मुलींचा जीव वाचवायला हवा.