नवी दिल्ली - विरोधी पक्षनेते आणि कँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी शुक्रवारी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला. भाजपाकडून आज शेतकरी संवाद अभियान राबवण्यात आले. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकरी संवाद अभियानावरून अधीर रंजन चौधरी यांनी मोदींवर टीका केली. दिल्लीत कृषी आंदोलन करणार्या शेतकर्यांशी समोरासमोर बोलण्याची हिम्मत मोदींमध्ये नाही, असे ते म्हणाले.
कृषी कायद्यांचा निषेध करणार्या शेतकर्यांशी समोरासमोर बोलण्याची हिम्मत मोदींमध्ये नाही. केंद्र सरकार 18,000 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करणार असल्याची चर्चा आहे. परंतु, मी असे म्हणू इच्छितो की मध्यस्थ लोक अजूनही अस्तित्त्वात आहेत आणि संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही, असे ते म्हणाले.
शेतकऱ्यांना मोदींच्या प्रवचनांची गरज नसून कृषी कायदे मागे घेण्याची गरज आहे. अधीर रंजन चौधरी यांच्यासह काँग्रेसेच प्रवक्ते जयवीर शेरगिल यांनी टि्वट करून मोदींवर टीका केली. शेतकऱ्यांना भाजपाच्या पोकळ भाषणे व प्रवचनांची गरज नाही. त्यांना कृषी कायदे मागे घेण्यासाठी ठोस तोडगा हवा आहे. भाजपाने सिंघू, टिकरी आणि अन्य आंदोलन स्थळांना भेट देऊन चर्चा करावी, असे शेरगिल म्हणाले.
शेतकरी संवाद अभियान -
केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा आजचा 30 वा दिवस आहे. कायदे रद्द होत नाहीत. तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका शेतकरी संघटनांनी घेतली आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलनाचा तिढा सोडवण्यासाठी भाजपकडून शेतकरी संवाद अभियान राबवण्यात आले. कृषी कायद्यांचे महत्त्व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपाचे अनेक नेत्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.
हेही वाचा - 'शेतकरी संवाद अभियान' : नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८ हजार कोटी रुपये जमा