राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये ( Commonwealth Games 2022 ) पुरुषांच्या लांब उडी स्पर्धेमध्ये ( Mens Long Jump Final ) भारताच्या मुरली शंकरने रौप्य पदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. मुरलीच्या रौप्य पदकाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील अॅथलेटिक्स विभागातील पदकांच्या कमाईस सुरुवात झाली. लांब उडीच्या अंतिम फेरीत मुरली श्रीशंकर ( Murali Sreeshankar ) व मुहम्मद अनीस याहिया ( Muhammed Anees Yahiya) या दोन लांब उडीपटूंमध्ये कडवी स्पर्धा पहायला मिळाली. लॅक्यून नैर्नला पुरुषांच्या गटात सुवर्णपदक मिळाले.
भारताच्या श्रीशंकरला पहिल्या चार प्रयत्नांत विशेष कामगिरी करता आली नाही. त्यात चौथ्या प्रयत्नात -१ सेंटीमीटरमुळे त्याची ८ मीटरची लांब उडी अवैध ठरली. तथापि, तो खचून न जाता त्याने पुढच्या पाचव्या प्रयत्नामध्ये ८.०८ मीटर लांब उडी मारली आणि थेट सहाव्या क्रमांकावरून थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत लांब उडीत भारताच्या दोन महिलांनी पदक जिंकले होते, पण पुरुषांमध्ये पदक जिंकणारा श्रीशंकर हा पहिलाच भारतीय ठरला आहे.
अंतिम फेरीमध्ये श्रीशंकर ८.३६ मीटर या सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीसह सुवर्णपदकाचा दावेदार होता. त्याला ऑस्ट्रेलियाच्या हॅरी फ्रेयन ( ८.३४ मी.) याचे आव्हान होते. मुहम्मद याहियाचाही पहिला प्रयत्न फाऊल ठरला होता, तर श्रीशकंरने पहिल्या प्रयत्नात ७.६० मीटर लांब उडी मारली. पहिल्या प्रयत्नात श्रीशंकर सहाव्या क्रमांकावर होता. बहामासच्या लॅक्यून नैर्न ( ७.९४ मी.) हा अव्वल राहिला.
तुर्क अँड कैकोस आयलँड्सच्या ओटूओन्येने दुसऱ्या प्रयत्नात ७.८० मीटरची त्याची उत्कृष्ट कामगिरी नोंदविली. याहियाने दुसऱ्या प्रयत्नात ७.६५ मीटर, तर श्रीशंकरने ७.८४ मीटर लांब उडी घेत स्पर्धेत आघाडी घेतली. दक्षिण आफ्रिकेच्या जोव्हान व्हॅन व्ह्यूरेनने त्याच्या दुसऱ्या प्रयत्नात ८.०६ मीटर लांब उडी मारली आणि इतर स्पर्धकांना मागे टाकले, परंतु लॅक्यून नैर्न याने ८.०८ मीटर लांब झेप घेत त्याच्यापुढे मजल मारली. दुसऱ्या फेरीनंतर श्रीशंकर पाचवा, तर याहिया सातवा स्थानावर होता. तिसऱ्या फेरीत जमैकाच्या शॉन डी थॉम्पसनने ८.०५ मीटर ही सिजन बेस्ट कामगिरी करत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली. याहियाने कामगिरीत सुधारणा केली आणि ७.७२ मीटर लांब उडी मारली. श्रीशंकरने तिसऱ्या प्रयत्नातही ७.८४ मीटर लांब उडी मारली. स्पर्धेच्या मध्यंतरात भारताचा श्रीशंकर सहावा व याहिया आठवा स्थानी राहिला. तीन प्रयत्नांनंतर आघाडीच्या ८ खेळाडूंना आणखी तीन संधी मिळतात.
चौथ्या प्रयत्नात श्रीशंकरने ८ मीटरपेक्षा अधिक लांब उडी मारली खरी, परंतु लँडींग बोर्डवर - १ सेंटीमीटरच्या फरकाने त्याचा हा प्रयत्न फाऊल ठरला. त्यानंतर त्याने पाचव्या प्रयत्नात ८.०८ मीटर लांब उडी मारली. याहियाने अखेरच्या प्रयत्नात ७.९७ मीटर लांब उडी मारून सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. दक्षिण आफ्रिकेच्या व्ह्यूरेनला ८.०६ मीटरसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. आता ८.०८ मीटरसह संयुक्तपणे सुवर्णपदकासाठी श्रीशंकर व लॅक्यून नैर्न हे दोघेही दावेदार होते. श्रीशंकरचा सहावा प्रयत्न फाऊल ठरल्याने त्याचे सुवर्णपदक हुकले, परंतु त्याने रौप्यपदक निश्चित केले. लॅक्यून नैर्नला सुवर्णपदक मिळाले.
हेही वाचा - Peacock in Raj Bhavan: नाच रे मोरा राजभवनात; पाहा थुई थुई नाचतानाचा व्हिडिओ