म्हैसूर - आपल्या प्रियकरासोबत पर्यटनासाठी गेलेल्या मुंबई येथील एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कर्नाटकातील बंगळुरुपासून सुमारे 150 किलोमीटर असलेल्या म्हैसूरमध्ये हा प्रकार घडला. विद्यार्थिनी तिच्या प्रियकरासोबत शहरातील चामुंडी टेकडीवर गेली असताना आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी आरोपींविरोधात लैंगिक छळाच्या आरोपावरून अलानहल्ली पोलीस ठाण्यामध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणाची दखल राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली असून त्यांनी पोलीस महासंचालकाला एक पत्रही लिहिले आहे.
याप्ररकरणी आतापर्यंत कोण काय म्हणाले....
- राष्ट्रीय महिला आयोगाचे पोलीस महासंचालकांना पत्र
राष्ट्रीय महिला आयोगाने म्हैसूर सामूहिक बलात्कार प्रकरणाची दखल घेतली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी कर्नाटक पोलीस महासंचालक यांना पत्र लिहून आरोपींना लवकरात लवकर पकडून पीडितेला न्याय द्यावा, असे म्हटलं आहे. तसेच कर्नाटक राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनाही याप्रकरणी पत्र पाठवण्यात आले आहे. एफआयआर नोंदवला गेला असताना अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. कर्नाटक पोलिसांनी वेगाने तपास करून न्याय द्यावा, असे रेखा शर्मा यांनी पोलिसांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
- आरोपींना लवकरच अटक केली जाईल - पोलीस आयुक्त
कर्नाटक पोलिसांनी आरोपींविरोधात एफआयआर दाखल केला आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था विभागातील अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रताप रेड्डी यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांना तिथे काही बियर बॉटल सापडल्या. पोलीस परिसरात असलेल्या बियर शॉपमधून सीसीटीव्ही फूटेज घेणार असून आरोपींना शोधतील. या प्रकरणी सविस्तर माहिती उघड करण्यास पोलिसांनी नकार दिला. ही एक नाजूक बाब आहे. सर्व माहिती उघड करू शकत नाही. या प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. लैंगिक छळाच्या आरोपावरून अलानहल्ली पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे आणि आरोपींना लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती शहर पोलीस आयुक्त डॉ. चंद्रगुप्त यांनी दिली.
- दोषींवर कठोर कारवाई - कर्नाटकचे मुख्यमंत्री
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी लवकरात लवकर आरोपींचा शोध घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
- वरिष्ठ अधिकाऱ्यांना म्हैसूरला पाठवले - गृहमंत्री
कर्नाटकचे गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र यांनी घटनेवर दु:ख व्यक्त केले. ही एक दुर्दैवी घटना आहे. याप्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला आहे. एडीजीपी प्रताप रेड्डी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना म्हैसूरला पाठवले आहे. मीही म्हैसूरलाही जाईन. आम्ही दोषींवर कठोर कारवाई करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
काय आहे नेमकं प्रकरण -
कर्नाटकातील बंगळुरुपासून सुमारे 150 किलोमीटर अंतरावर म्हैसूर आहे. म्हैसूर शहरापासून 13 कि.मी दूर असलेल्या चामुंडी टेकडीवर पीडित तरुणी आपल्या मित्रासोबत फिरण्यासाठी गेली होती. दोघजण एकातांत बसले होते. यावेळी आरोपींनी त्या दोघांचे मोबाईलवर खासगी क्षण चित्रित केले.
आरोपी दोघांजवळ गेले आणि त्यांना व्हिडिओ दाखवत धमकावले. पीडिताकडे 3 लाख रुपयांची मागणी केली. संपूर्ण प्रकरणाने ते दोघेही घाबरले होते. आपल्या जीवासाठी त्यांनी पैसे देण्यास होकार दिला. मात्र, 2 वाजेपर्यंत पैशांची जुळवाजुळव पीडित करू शकले नाही. यावर आरोपींनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. यानंतर त्यांनी तरुणाला दगडाने मारले. दोघांना मरणाअवस्थेत सोडून पीडितेचा मोबाईल घेत आरोपींनी पळ काढला.
पीडित तरुणी आणि तरुण दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व आरोपी दारूच्या नशेत धुंद होते. त्यांचे वय 20 ते 30 असे होते. ते आपसात कन्नड भाषा बोलत असल्याचे तरुणाने पोलिसांना सांगितले. त्यामुळे आरोपी स्थानिकच असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे.
हेही वाचा - मुंबईच्या विद्यार्थीनीवर म्हैसूरमध्ये सामूहिक बलात्कार, प्रियकराला केली बेदम मारहाण