लखनौ : समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव ( Mulayam Singh Yadav ) यांच्या पार्थिवावर मंगळवारी त्यांच्या मूळ गावी सैफई येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांना आज राज्य सन्मानाने अंतिम निरोप देण्यात येणार आहे. ज्यामध्ये सीएम योगी यांच्यासह अनेक दिग्गज नेते सैफईला जाणार आहेत. ( Mulayam Singh Yadav funeral )
दुपारी तीनच्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यसंस्कार : राजधानी लखनऊ येथील पक्षाच्या मुख्यालयात आणण्याऐवजी सैफईमध्येच त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात येतील, असे समाजवादी पक्षाकडून सांगण्यात आले आहे. मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास त्यांना शासकीय इतमामात दहन करण्यात येणार आहे. आधी मुलायम सिंह यादव यांचे पार्थिव सपा मुख्यालयात आणले जाईल, असे मानले जात होते. पण, राजधानी लखनऊमध्ये मुसळधार पावसामुळे त्यांचे पार्थिव मेदांता येथून थेट सैफई येथे नेण्यात आले.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीन दिवसांचा राजकीय दुखवटा केला जाहीर : सपा प्रमुख मुलायम सिंह यादव यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. त्याचवेळी मुलायम सिंह यादव यांच्या निधनानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. मुलायमसिंग यादव यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, सर्व केंद्रीय मंत्री आणि इतर राज्यांचे मुख्यमंत्री, काँग्रेस पक्षाकडूनही शोक व्यक्त करण्यात आला आहे.