बंगळुरू : उन्हाळा म्हटलं की आपल्याला आठवतो फळांचा राजा आंबा, आणि त्याच्या विविध प्रजाती. कोणाला हापूस आवडतो, कोणाला पायरी तर कोणाला तोतापुरी. प्रत्येक प्रजातीचा आंबा खायचा असेल, तर त्या-त्या प्रजातीचं झाड लावणं आपल्याला आवश्यक आहे. मात्र जर एकाच झाडाला या सर्व प्रजातींचे आंबे लागले तर? अशक्य वाटतंय ना? आजीबात नाही. कर्नाटकच्या शिवमोग्गामधील एका व्यक्तीने आंब्याच्या एका झाडावर तब्बल २० हून अधिक प्रजातींचे आंबे मिळवून दाखवले आहेत.
के. श्रीनिवास हे शिवमोग्गाच्या विजयनगरमध्ये राहतात. ते सहाय्यक फलोत्पादन अधिकारी म्हणून काम करत. १५ वर्षांपूर्वी ते निवृत्त झाले. निवृत्त झाल्यानंतर छंद म्हणून त्यांनी घराच्या अंगणात एक आंब्याचे झाड लावले. त्यानंतर त्यांनी काही वर्षांमध्ये एक-एक करत आंब्याच्या इतर प्रजातींची कलमं याच झाडावर लावली. त्यांची एवढ्या वर्षांची मेहनत आता फळाला आलीये. या एकाच झाडावर आता तब्बल २०हून अधिक प्रकारचे आंबे येत आहेत.
या झाडावर रत्नागिरी, तोतापुरी, बैगन, मल्लिका आणि इतर अनेक प्रजातींचे आंबे तुम्हाला पहायला मिळतील. श्रीनिवास जेव्हा कधी कुठे फिरायला जात, तेव्हा ते तिथलं स्थानिक आंब्याचं कलम आपल्या सोबत घेऊन येत. आल्यानंतर ते या झाडाला ते कलम जोडत. आता या झाडाला येत असलेले आंबे ते स्वतःही खातात, आणि शेजाऱ्यांनाही वाटतात. अशा प्रकारे जर आंब्याचे उत्पादन घेतले, तर शेतकरी अधिक नफा कमवू शकतील, असे श्रीनिवास सांगतात.
हेही वाचा : पारंपरिक शेतीऐवजी पिकवले ड्रॅगन फ्रूट, खर्च 20 हजार अन् आठ लाखांचा फायदा!