मुंबई - महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चर्चेत आहेत. कोरोना, राजकीय आव्हाने, नैसर्गिक संकट, पक्षांतील अंतर्गत संघर्ष आणि सरकारमध्ये निर्माण होणारी आशा सर्व परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगली कामगिरी केली आहे. पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले उद्धव ठाकरे यांनी देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्याच्या यादीत फक्त स्थानच मिळवले नाही. तर नंबर वन आले आहेत. प्रश्नम या संस्थेने देशातील 13 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीबाबत मतदारांकडे सर्वेक्षण केले होते. यातून ही माहिती समोर आली आहे.
उद्धव ठाकरेंनी लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत नाव पटकावल्यानंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनाने(मनसे) प्रश्नम संस्थेच्या सर्वेक्षणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 'आमच्या वर्गात एक मुलगा होता. तो अभ्यास करायचा नाही. पण तो वर्गात नंबर वन यायचा. एकतर तो खूप हुशार असेल किंवा मग कॉपी करुन किंवा मॅनेज करुन पास झाला असेल, असेच मुंख्यमंत्र्यांचे आहे', अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. तसेच नंबर एक असण्यासाठी काम करावं लागतं, दीड वर्षात काय केलं?” असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला.
काय म्हटलं मतदारांनी सर्वेक्षणात?
प्रश्नम संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार 49 टक्के मतदारांनी पुढच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनाच मतदान करणार असल्याचे सांगितले. देशातील मुख्यमंत्र्यांच्या सर्वेक्षणात 13 राज्यांमधील सुमारे 17,500 मतदारांना याबाबत आपली मतं विचारण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील सर्वेक्षण 49 टक्के मतदारांना असा विश्वास आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगली कामगिरी केली आहे आणि ते त्यांना पुन्हा निवडून देतील.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान 44 टक्के मतांनी दुसर्या क्रमांकावर आहेत. तिसऱ्या क्रमांकावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आहेत. सर्वेक्षण केलेल्या 40 टक्के मतदारांनी त्यांच्या कामगिरीला मान्यता दिली. तर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मतदारांनी नाकारले आहे. सर्वेक्षणात 60 टक्के लोकांनी मुख्यमंत्र्यांची कामगिरी खराब असल्याचे सांगितले.
हेही वाचा - आर्मी बोलवा किंवा पोलीस.. शुक्रवारपासून व्यापार सुरू करणारच, कोल्हापूर चेंबर्स ऑफ कॉमर्सचा इशारा
हेही वाचा - पंजाब : काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नवज्योत सिंग सिद्धू यांच्या नावाची चर्चा