नवी दिल्ली - कोरोनाचा कहर सुरू असताना डॉक्टरांना रुग्णांना सल्ला देताना व्हॉट्सअप आणि व्हिडिओची मदत घ्यावी लागत आहे. मात्र, कोरोनाचा कहर सुरू असलेल्या दिल्लीत व्हॉट्सअपवरून सल्ला देतानाही आर्थिक लूट सुरू असल्याचे समोर आले आहे. दिल्लीमधील मॅक्स रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरने कोरोनाबाधित रुग्णाला व्हिडिओवरून सल्ला देण्याकरता ५० हजारांची मागणी केली आहे. हा प्रकार समजताच रुग्णालय प्रशासनाने डॉक्टरला नोकरीतून काढून टाकले आहे.
मॅक्स रुग्णालयाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, विकास अहलुवालिया असे हकालपट्टी करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे. हा डॉक्टर मॅक्स रुग्णालयात मधुमेहतज्ज्ञ म्हणून कार्यरत होता. डॉ. अहलुवालियाने वैयक्तिक स्वार्थासाठी रुग्णाकडे अतिरिक्त पैशाची मागणी केली. हा प्रकार समजताच रुग्णालय प्रशासनाने डॉक्टरला रुग्णालयाच्या सर्व सेवेमधून काढून टाकले आहे.
हेही वाचा-अधिकाऱ्यांना तुरुंगात ठेवल्याने दिल्लीत ऑक्सिजन येऊ शकत नाही- सर्वोच्च न्यायालय
डॉक्टर व्हॉट्सअपवरून ५० हजार पैसे मागत असल्याचे चॅट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. २४/७ व्हॉट्सअपमधून सेवा देण्यासाठी ५० हजार रुपये लागणार असल्याचे डॉक्टरने चॅटमध्ये म्हटले आहे. त्यानंतर मॅक्स रुग्णालयाने संबंधित डॉक्टरवर कारवाई केली आहे.
दिल्लीमध्ये ९०,४१९ कोरोनाचे सक्रिय रुग्ण असताना ऑक्सिजनचा तुटवडा
दरम्यान, दिल्ली सरकारच्या हेल्थ बुलिटेनच्या आकडेवारीनुसार ४ मे रोजी २४ तासात कोरोनाचे नवीन १९,९५३ रुग्ण आढळले आहेत. तर १८,७८८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र, ३३८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिल्लीमध्ये कोरोनाचे आजवर १२,३२,९४२ रुग्ण आढळले आहेत. दिल्लीमध्ये आजपर्यंत ११,२४,७७१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर आजपर्यंत एकूण ७,७५२ जणांचा मृत्यू जाला आहे. दिल्लीमध्ये ९०,४१९ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. दिल्लीमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असल्याने गंभीर परिस्थिती आहे.
हेही वाचा-देवेंद्र फडणवीस हेच आरक्षण कायद्याच्या विरोधात; नवाब मलिक यांचा आरोप