इंफाळ Manipur Violence : मणिपूरमध्ये गेल्या चार महिन्यांत किमान 175 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसंच 1 हजार 108 जण जखमी झाले आहेत, तर 32 जण बेपत्ता आहेत. गुरुवारी पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मे महिन्यात सुरू झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत 4 हजार 756 घरे जाळण्यात आली असून 386 धार्मिक स्थळे पाडण्यात आली आहेत.
परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न : मणिपूरमधील हिंसाचाराबद्दल पोलीस महानिरीक्षकांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, मणिपूरमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आम्ही नेहमीच जनतेसोबत आहोत. पोलीस, केंद्रीय दलं, नागरी प्रशासन परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी चोवीस तास प्रयत्न करत असल्याचं त्यांनी म्हटलंय.
दंगलखोरांनी पळवलेली शस्त्रे जप्त : आत्तापर्यंत हिंसाचारात पोलिसांची 1 हजार 359 दंगलखोरांनी पळवलेली शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. तसंच 15,050 दारुगोळा जप्त केला. हरवलेल्या शस्त्रांपैकी 1,359 बंदुका आणि 15 हजार 50 दारुगोळाही जप्त करण्यात आला आहे. हिंसाचारात दंगलखोरांनी पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे, दारूगोळा लुटला असल्याची माहिती महानिरीक्षकांनी दिलीय.
386 धार्मिक स्थळांची तोडफोड : मणिपूर हिंसाचार प्रकरणी जाळपोळीच्या घटनात किमान 5 हजार 172 घटनांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 386 धार्मिक स्थळांची तोडफोड करण्यात आली आहे. त्यात 254 चर्च, 132 मंदिरांचा समावेश आहे. यासोबतच बिष्णुपूर जिल्ह्यातील फौगाकचाओ इखाई ते चुराचंदपूर जिल्ह्यातील कंगवाईपर्यंत सुरक्षा बॅरिकेड हटवण्यात आले आहेत. तर राष्ट्रीय महामार्गांवर सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
325 दंगलखोरांना अटक : पोलीस महानिरीक्षक के. जयंत यांनी सांगितलं की, मृत्युमुखी पडलेल्या 175 लोकांपैकी नऊ जणांची अद्याप ओळख पटलेली नाही. 70 जणांच्या मृतदेहांवर नागरिकांनी दावा केलाय तर, 96 मृतदेहांवर अजून कुणीही हक्क सांगितलेला नाही. 28 आणि 26 मृतदेह अनुक्रमे RIMS आणि JNIMS (इंफाळमधील रुग्णालयात) ठेवण्यात आले आहेत. तर 42 मृतदेह चुराचंगपूर हॉस्पिटलमध्ये ठेवले आहेत. तसंच हिंसाचार प्रकरणी 9 हजार 332 प्रकरणे नोंदवण्यात आली असून 325 लोकांना अटक आल्याचं पोलीस महानिरीक्षक के. जयंत यांनी म्हटलंय.
हेही वाचा -