इंफाळ : मणिपूरमध्ये उग्रवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारतीय लष्कराचा जवान जखमी झाल्याने खळबळ उडाली आहे. 18 आणि 19 जूनच्या मध्यरात्री सशस्त्र हल्लेखोरांनी कांटो सबल येथून चिंगमांग गावात गोळीबार केला. या गोळीबारात जखमी झालेल्या भारतीय लष्कराच्या जवानाला लिमाखोंगच्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या या जवानाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती भारतीय लष्कराच्या स्पिअर कॉर्प्सच्या अधिकाऱ्याने सोमवारी दिली.
उग्रवाद्यांच्या गोळीबाराला लष्कराचे प्रत्युत्तर : 18 आणि 19 जूनच्या रात्री सशस्त्र उग्रवाद्यांनी कांटो सबल येथून चिंगमांग गावाकडे गोळीबार केल्याची माहिती स्पीयर कॉर्प्सने केलेल्या ट्विटमध्ये दिली. परिसरात गावकऱ्यांची उपस्थिती लक्षात घेता लष्कराच्या तुकड्यांनी नियंत्रित प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. मात्र यादरम्यान गोळीबारात लष्कराचा एक जवान जखमी झाला. त्याला लिमाखोंगच्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. या परिसरात अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले असून संयुक्त ऑपरेशन सुरू असल्याची माहिती लष्कराच्या वतीने देण्यात आली आहे.
मणिपूरमध्ये कर्फ्यू शिथिल : भारतीय लष्कराने रविवारी इम्फाळ खोऱ्यातील हिंसाचारग्रस्त भागात फ्लॅग मार्च काढला. इंफाळ पूर्व जिल्ह्याच्या जिल्हा अधिकारी खुमंथेम डायना देवी यांनी शनिवारी 18 जून आणि रविवारी सकाळी 5 ते संध्याकाळी 5 या वेळेत कर्फ्यू शिथिल करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सर्वसामान्यांना औषधे आणि खाद्यपदार्थांसह जीवनावश्यक वस्तू खरेदी करता आल्या आहेत.
कुकी आणि मेईतेई समुदायांमध्ये संघर्ष : कुकी आणि मेईतेई समुदायांमधील संघर्षानंतर मणिपूरमध्ये कलम 144 अंतर्गत कर्फ्यू लागू करण्यात आला होता. त्यानंतर झालेल्या हिंसाचारात 100 हून अधिक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून हजारो नागरिक बेघर झाले. पूर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी कर्फ्यू शिथिल केला करण्याचे आदेश दिले आहेत. यात हट्टा क्रॉसिंग ते आरडीएस क्रॉसिंग, इंफाळ नदी सॅनझेनथॉंग ते मिनुथोंग, मिनुथोंग ते हट्टा क्रॉसिंग आणि आरडीएस क्रॉसिंग ते सॅनझेनथाँग यांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भाजपच्या कार्यालयात तोडफोड : मणिपूरच्या थोंगजू येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाची शुक्रवारी जमावाने तोडफोड केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मणिपूरमध्ये बुधवारी झालेल्या हिंसाचारात नऊ जण ठार झाले, तर 10 हून अधिक जण जखमी झाले. राज्य सरकारने राज्यातील इंटरनेट बंदची मुदत 20 जूनपर्यंत वाढवली आहे. बुधवारी मणिपूरचे मंत्री नेमचा किपजेन यांचे इंफाळ येथील सरकारी निवासस्थान जाळण्याचा प्रयत्न उग्रवाद्यांनी केला.
हेही वाचा -