इंफाळ - सध्या 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. यामध्ये गोवा, पंजाब आणि उत्तराखंडमधील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर उत्तर प्रदेशमधील मतदानाचे पाच टप्पे पूर्ण झाले आहेत. आज मणिपूरमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे. विधानसभेच्या 60 पैकी 38 जागांसाठी मतदानाला सुरवात झाली आहे. बहुमत मिळण्यासाठी 31 किंवा त्यापेक्षा अधिक जागा जिंकण्याची आवश्यकता आहे. पहिल्या टप्प्यात 173 उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी 15 महिला उमेदवार आहेत. मणिपूर विधानसभेच्या 60 जागांसाठी 28 फेब्रुवारी आणि ५ मार्चला मतदान आहे.
मतदान शांततेत पार पडावे यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांकडून चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. मतदान केंद्रांवर स्थानिक पोलिसांसोबतच निमलष्करी दलाचे जवानही तैनात आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे, तेथे पोलीस सतर्क आहेत. जिल्ह्याच्या सीमेवर चेकिंग अधिक तीव्र करण्यात आली आहे. मणिपूरमध्ये सत्तारूढ भाजपा विरुद्ध काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांमध्येच प्रमुख सामना आहे. सध्याचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह हे हिंगांग मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
प्रमुख उमेदवार -
मुख्यमंत्री आणि भाजपचे उमेदवार एन. बिरेन सिंग, त्यांचे मंत्रिमंडळ सहकारी थोंगम बिस्वजित सिंग, एनपीपीचे उमेदवार आणि उपमुख्यमंत्री युमनम जॉयकुमार सिंग, भाजपचे ज्येष्ठ नेते थोकचोम सत्यब्रत सिंग, काँग्रेसचे रतनकुमार सिंग, लोकेश्वर सिंग, सरचंद्र सिंग, आमदार अकोजम मीराबाई देवी यांचे भवितव्य पणाला लागले आहे.
2017 निवडणूक -
2017 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 28 जागा जिंकल्या तर भाजपला मणिपूरमध्ये 21 जागांवर विजय मिळवला होता. राज्यात भाजपाने नॅशनल पीपल्स पार्टी (National People's Party - NPP), नागा पीपल्स फ्रंट (Naga People's Front - NPF) आणि लोक जनशक्ती पार्टी (Lok Janshakti Party - LJP) सोबत आघाडी केली आणि सत्तेसाठी दावा केला होता. पक्षात मोठ्या प्रमाणात फूट पडल्याने काँग्रेसला सरकार स्थापन करण्यात अपयश आले होते. त्यांच्या 15 आमदारांनी पक्षांतर केले होते. 2002 ते 17 या 15 वर्षांच्या कालखंडात राज्यात काँग्रेसची सत्ता होती. भाजपाने 2017मध्ये पहिल्यांदाच मणिपूरमध्ये सरकार स्थापन केले होते.
हेही वाचा - Russia-Ukraine Crisis : युक्रेनमधून अवघ्या 20 वर्षाची निधी मायदेशी परतली, ETV BHARAT स्पेशल रिपोर्ट