कोलकाता - राज्यपाल जगदीप धनखर यांनी पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालक वीरेंद्र यांच्या नियुक्तीविरोधात प्रश्न उपस्थित केले. वीरेंद्र यांची डीजीपी म्हणून नियुक्ती करणे बेकायदेशीर आहे, असे ते म्हणाले. या प्रकरणासंदर्भात जगदीप धनखर यांनी मुख्यमंत्र्यांना टॅग करत ट्विट केले आहे.
वीरेंद्र हे मुख्यमंत्र्यांचे सुरक्षा सल्लागार होते. नंतर, ममता बॅनर्जी यांनी त्यांना राज्य पोलिसांचे महासंचालक म्हणून नियुक्त केले. विधानसभा निवडणुका होण्यापूर्वी निवडणूक आयोगाने वीरेंद्र यांना त्यांच्या पदावरून दूर केले होते. मात्र, मतदानानंतर मुख्यमंत्र्यांनी वीरेंद्र यांना पुन्हा पोलीस महासंचालक पदी नियुक्ती केली, असे धनखर म्हणाले.
ममता बॅनर्जी यांच्या सरकारने तात्पुरते आधारावर कोणालाही प्रभारी नियुक्त करु नये. तर यूपीएससी पॅनेलमधील व्यक्तीला डीजीपी म्हणून नियुक्त करावे. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले पाहिजे, असे त्यांनी एका टि्वटमध्ये म्हटलं आहे.
पश्चिम विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालक वीरेंद्र यांची तात्काळ बदली केली होती. तर पी. नीरजनयन यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती केली होती. वीरेंद्र यांना निवडणुकीशी संबंधित कुठलीही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जबाबदारी देऊ नये, असे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. वीरेंद्र हे १९८५ च्या बॅचचे अधिकारी आहेत.