कोलकाता : नंदीग्राममध्ये प्रचारावेळी जखमी झालेल्या ममता बॅनर्जी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. रुग्णालयाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीपत्रकानुसार, डॉक्टर त्यांना आणखी दोन दिवस रुग्णालयात ठेऊ इच्छित होते. मात्र, त्यांनी डिस्चार्ज देण्यास सांगितल्यामुळे त्यांना सोडण्यात आले.
काय आहे प्रकरण..
ममता बॅनर्जी नंदीग्रामध्ये प्रचारासाठी पोहचल्या होत्या. एका मंदिरातून दर्शन घेत, ममता बॅनर्जी गाडीमध्ये बसत असताना चार-पाच लोकांनी जोरात गाडीचा दरवाजा ढकलला. यावेळी ममता यांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्या डाव्या पायाला, उजव्या खांद्याला आणि मानेला दुखापत झाली.
ममतांवरील हल्ला आणि राजकारण..
दरम्यान तृणमूलतर्फे खासदार डेरेक ओब्रायन, राज्यमंत्री चंद्रिमा भट्टाचार्य आणि पार्थ चॅटर्जी यांनी निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. ९ मार्चला निवडणूक आयोगाने डीजीपींना बदलण्याचे आदेश दिले. दहा मार्चला एका भाजपा नेत्याने 'संध्याकाळी पाच वाजल्यानंतर तुम्हाला कळेल की काय होणार आहे' अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर केली होती. त्यानंतर संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास ममतांवर हल्ला झाला. या प्रकाराचा आम्ही निषेध करतो. सत्य लवकरात लवकर बाहेर यावे अशी आमची मागणी आहे, असे माध्यमांशी बोलताना डेरेक ओब्रायन म्हणाले.
हेही वाचा : ममतांवरील हल्ल्यात 'निक्करवाल्यांचा' हात; मदन मित्रांचा संघावर आरोप