कल्याण सिंह यांचा आरएसएस कार्यकर्ता ते उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदापर्यंतचा संघर्षमय प्रवास, जाणून घ्या... - kalyan singh death
कल्याण सिंह यांच्या आरएसएस कार्यकर्ता ते उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदापर्यंतच्या संघर्षमय प्रवासावर एक नजर...
लखनऊ - उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राजस्थानचे माजी राज्यपाल कल्याण सिंह यांचे नुकतेच निधन झाले. त्याला श्वसनाचा त्रास होता. त्यांच्यावर राजधानीच्या संजय गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये (एसजीपीजीआय) उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. कल्याण सिंह यांच्या आरएसएस कार्यकर्ता ते उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदापर्यंतच्या संघर्षमय प्रवासावर एक नजर.
शेतकरी कुटुंबात जन्म
उत्तर प्रदेशच्या अलीगढमध्ये कल्याण सिंह यांचा एका शेतकरी कुटुंबात 5 जानेवरी 1932 ला जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांच्यात हिंदूत्व खोलवर रुजलले होते. आरएसएसच्या तालमीत त्यांची वैचारिक जडणघडण झाली. सुरवातील संघाचा एक कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केले. नंतर जनता पक्ष आणि भाजपासाठी त्यांनी तळागाळात काम केले. त्यांच्या कामाचे फळ त्यांना मुख्यमंत्री पदाच्या रुपात मिळाले. कर्तव्य कठोर नेता आणि राम मंदिराचे कट्टर समर्थक अशी त्यांनी ओळख होती.
संघासाठी काम करत 30 व्या वर्षी राजकारणात प्रवेश
संघासाठी काम करत असताना वयाच्या 30 वर्षी कल्याण सिंह यांनी राजकारणात प्रवेश केला. जन संघकडून त्यांना अलीगढमधील अतरौली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. मात्र, पहिल्यांदा लढवलेल्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तेथूनच त्यांच्या खरा राजकीय प्रवास सुरू झाला. पराभव झाला, तरी मतदारसंघात ते सक्रिय होते. अखेर 1967 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसविरोधात निवडणुक लढवली आणि विजय मिळवला. त्यानंतर पुढील 13 वर्ष ते अपराजित राहिले. मात्र, 1980 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अन्वर खान यांच्याकडून ते पराभूत झाले. त्यानंतर 1985 च्या निवडणुकीत जोरदार धडक देऊन पुनरागमन केले. त्यानंतर पुढची 19 वर्षे म्हणजेच 2004 पर्यंत ते अतरौलीचा निर्विवाद आमदार राहिले.
बाबरी विध्वंस प्रकरणात कल्याण सिंह यांची पडद्यामागे मोठी भूमिका?
उत्तर प्रदेशात कल्याण सिंह हे हिंदूहृदय सम्राट म्हणून ओळखले जातात. 1991 मध्ये जेव्हा राज्यात बाबरी मशिदीवरून रणकंदन माजले होते. त्या परिस्थितीत सिंह यांची हिंदूत्ववादी विचारसरणी आणखी प्रखर होत गेली. याच काळात झालेल्या विधानसभा निवडणुकीत सिंह यांच्या नेतृत्वात भाजपाने 221 जागावर विजय मिळवत उत्तर प्रदेशात सत्ता स्थापन केली. त्यांची कामगिरी पाहून 1991 मध्ये भाजपाने त्यांना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान केले. मात्र, त्याच्या पुढच्याच वर्षी 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येत बाबरी मशीद पाडण्यात आली. मशीद पाडल्यानंतर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरल्याने कल्याण सिंह यांनी 6 डिसेंबर रोजी संध्याकाळी पदाचा राजीनामा दिला. बाबरी विध्वंस प्रकरणात कल्याण सिंह यांची पडद्यामागे मोठी भूमिका होती आणि सर्व काही त्यांच्या संमतीने घडत होते, असे म्हटलं जातं. ते एक कट्टर हिंदूवादी होते.
कल्याण सिंह यांनी पुन्हा 1993 मध्ये अतरौली आणि कासगंज मतदारसंघातून निवडणुक लढवली. यात त्यांनी विजय मिळवला. या निवडणुकीत भाजपाने इतर पक्षांपेक्षा जास्त जागा जिंकल्या. मात्र, मुलायम सिंह यादव यांचा समाजवादी पक्ष आणि बसपा भाजपाविरोधात एकत्र आले आणि राज्यात सत्ता स्थापन केली. तेव्हा उत्तराखंड हा उत्तर प्रदेशचा भाग होता आणि एकूण जागा 422 होत्या. सत्तेबाहेर पडल्यानंतर कल्याण सिंह यांनी आक्रमकतेने विरोधीपक्षाची भूमिका निभावली. मात्र, बसपा आणि समाजवादी पक्षात फूट पडली. यानंतर घडलेल्या कुप्रसिद्ध 'गेस्ट हाऊस' घटनेमुळे राजकीय उलथापालथ झाली.
लोकतांत्रिक काँग्रेससोबत हात मिळवणी
पुढील विधानसभा निवडणुकीसाठी अजून एक वर्ष शिल्लक असतानाच, भाजपाने बसपाबरोबर युती केली आणि सरकार स्थापन केले. ठरलेल्या कार्यक्रमानुसार सहा महिने बसपा आणि सहा महिने भाजपाचा मुख्यमंत्री होईल, असे ठरले. पहिले सहा महिने बसपाच्या मायावती यांनी मुख्यमंत्री पद सांभाळले. मात्र, जेव्हा भाजपाचा मुख्यमंत्री होण्याची वेळ आली. तेव्हा बसपाने पाठिंबा काढून घेतला आणि सरकार कोसळले. यानंतर सिंह यांनी तत्कालीन काँग्रेसचे आमदार नरेश अग्रवाल यांना विश्वासात घेतले. नरेश अग्रवाल यांनी बंडखोरी करत काँग्रेस पक्ष सोडला आणि आपल्यासोबत 21 आमदारांना सोबत घेत, नव्या लोकतांत्रिक काँग्रेस पक्षाची स्थापना केली. नरेश अग्रवाल यांच्या पाठिंब्याने सत्तेत आल्यानंतर सिंह यांनी अग्रवाल यांना सरकारमधील उर्जा खाते दिले.
अटल बिहारी वाजपेयी यांच्यासोबत वाद
1990 च्या काळात राष्ट्रीय राजकारणात कल्याण सिंह यांनी स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केलं. मात्र, भाजपाचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्यासोबत वाद झाल्याने 1999 मध्ये भाजपा सोडलं. पुन्हा पाच वर्षानंतर त्यांनी भाजपात प्रवेश करत बुलदेंशहरमधून लोकसभेची निवडणूक लढली. मात्र, पक्षासोबतचे त्यांचे अंतर्गत वाद वाढतच होते. यात 2009ला ते पुन्हा भाजपातून बाहेर पडले आणि अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि जिंकलीही. यानंतर त्यांनी यांनी स्वताचा जन क्रांती पक्षाची (राष्ट्रवादी) स्थापना केली.
नितीन गडकरींकडून कल्याण सिंह यांची मनधरणी
2014 च्या लोकसभा निवडणुका जवळ आल्यानंतर भाजपाकडून त्यांना बोलावणे आले. तत्कालीन भाजपा अध्यक्ष नितीन गडकरी यांनी सिंह यांची मनधरणी केल्यानंतर जेकेपी (आर) भाजपामध्ये विलीन झाला. 26 ऑगस्टला सिंह यांची भाजपाकडून राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. जानेवरी 2015 मध्ये त्यांना हिमाचल प्रदेशचा राज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला. सिंह हे एक वलय निर्माण करणारे नेता होते. त्यांनी नेहमीच मोठी स्वप्न पाहिली आणि त्यांना प्रत्यक्षात उतरवलं. देशाच्या राजकीय वर्तुळात, विशेषत: उत्तर प्रदेशामध्ये त्यांची ओळख मुत्सद्दी राजकारणी अशी होती. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणाशी त्यांची नाळ जोडलेली होती.