बंगळुरू Karnataka High Court Orders : पकडण्यात आलेल्या आरोपीला त्याच्या ज्ञात भाषेत अटकेचं कारण सांगितलं नाही. त्यासह त्याला त्याच्या कळणाऱ्या भाषेत कागदपत्रं न दिल्यानं त्याची सुटका करण्याचे आदेश कर्नाटक उच्च न्यायालयानं दिले आहेत. रोशन जमीर उर्फ जम्मू असं न्यायालयानं सुटका केलेल्या आरोपीचं नाव आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती के सोमशेखर आणि न्यायमूर्ती के राजेश राय यांच्या खंडपीठानं हे आदेश दिले आहेत. अटक केलेल्या आरोपीचे वडील मोहम्मद शफीउल्लाह रोशन जमीर यांनी दाखल केलेल्या हेबियस कॉर्पस याचिकेवर सुनावणी करताना खंडपीठानं हा आदेश दिला.
आरोपीनं केला फक्त उर्दू भाषेचा अभ्यास : आरोपीनं अरबी शाळेत दुसरी इयत्तेपर्यंतच शिक्षण घेतलं आहे. त्यानं फक्त पहिली भाषा म्हणून अरबी किंवा उर्दूचा अभ्यास केला. त्याला इतर भाषा येत नाहीत. शिवाय त्यानं फक्त तीन वर्षे शिक्षण घेतलं आहे. मात्र भारतीय राज्यघटनेच्या कलम 22(5) नुसार अटक केलेल्या कोणत्याही आरोपीला त्याला ज्ञात असलेल्या भाषेत कागदपत्रं प्रदान करणं आवश्यक आहे. या प्रकरणात आरोपीला त्याच्या ज्ञात भाषेत अटक करण्याचं कारण समजावून सांगता आलं नाही. त्यासह त्याचे कागदपत्रंही त्याच्या ज्ञात भाषेत देण्यास अधिकारी अपयशी ठरले. या कारणानं आरोपीच्या सुटकेचे आदेश देण्यात येत असल्याचं कर्नाटक उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं सांगितलं आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिली कन्नड आणि इंग्रजी भाषेत कागदपत्रं : पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला गुंडगिरी करण्यासंदर्भातील कायद्याच्या विविध कलमाखाली अटक केली होती. मात्र पोलिसांनी त्याला त्याच्या अटकेचं कारण त्याच्या ज्ञात भाषेत सांगता आलं नाही. पोलिसांनी त्याला त्याच्या अटकेची कागदपत्रंही इंग्रजी आणि कन्नड भाषेतून दिली. मात्र आरोपीला फक्त उर्दू भाषा येत होती. त्यामुळं आरोपीच्या वकिलांनी युक्तीवाद करताना हे घटनेच्या कलम 22( 5) चं उल्लंघन असल्याचं स्पष्ट केलं. आरोपीला अटक का करण्यात आली, याचा तपशीलही त्याला माहिती नव्हता. याशिवाय गुंडा कायद्याच्या कलम 8 अंतर्गत अपील दाखल करणंही शक्य नाही, असंही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं. त्यामुळे आरोपीच्या सुटकेचे आदेश देण्याची विनंती त्यांनी न्यायालयाला केली.
सोडण्यात आलेल्या आरोपीवर 15 खटले प्रलंबित : आरोपीला त्याच्या ज्ञात भाषेत अटकेची कागदपत्रं दिली नाहीत. त्यामुळं न्यायालयानं त्याची सुटका केली. मात्र या आरोपीवर 2013 पासून तब्बल 15 खटले प्रलंबित असल्याची माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयाला दिली. त्यानं अनेक गुन्हेगारी कृत्य केली आहेत. त्यासह त्याला इंग्रजी आणि कन्नड या दोन भाषा येत असल्याचा दावाही सरकारी वकिलांनी केला. त्यामुळे पोलिसांनी 27 एप्रिल 2023 ला आरोपी जमीरविरोधात गुंडा कायद्यानुसार कारवाई केली. त्याच दिवशी त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याला बंगळुरू इथल्या परप्पा अग्रहारा मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आलं. त्यानंतर सरकारनं त्याच्या अटकेचे वॉरंट कायम ठेवले. त्यानंतर त्याच्या वडिलांनी हेबियस कॉर्पस याचिका दाखल केल्याची माहिती दिली.
हेही वाचा :