बंगळुरू - यंदाही कोल्हापूरसह सांगली जिल्ह्याला महापुराचा फटका बसू नये, यासाठी महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची भेट घेतली. ही बैठक सुमारे ५० मिनिटे चालली. या बैठकीत पुरनियंत्रणाकरिता समन्वयाने काम करण्याची दोन्ही राज्यांनी सहमती दर्शविली आहे.
कनार्टकच्या मुख्यमंत्र्यांनी बैठकीत कृष्णा आणि भीमेच्या पुराने होणाऱ्या परिणामांची चर्चा केली. तसेच पुरनियंत्रणाबाबतही दोन्ही राज्यांच्यावतीने एकत्रित समन्वयाने काम करण्यावरही चर्चा करण्यात आली. बी. एस. येडियुरप्पा माध्यमांशी बोलताना म्हणाले, की कृष्णा आणि भीमा नदीच्या पुरापुळे होणाऱ्या आपत्कालीन स्थितीबाबत चर्चा केली आहे. पाण्याचा विसर्ग, पाऊस आणि पाण्याची-देवाण-घेवाण यावरही चर्चा झाली आहे. महाराष्ट्रातून ४ टीएमसी पाणी उन्हाळ्यात घेण्याबाबत तांत्रिक सल्लागार समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर तेवढेच पाणी पावसाळ्यात सोडण्याबाबतही समिती विचार करणार आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांचा दूध गंगा हा संयुक्त प्रकल्प आहे. हा प्रकल्प २ वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
हेही वाचा-पत्नीच्या मृत्यूनंतर केवळ ५ दिवसांत मिल्खासिंग यांचे निधन, आज सायंकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार
पुरस्थिती नियंत्रणात राहणे शक्य
कर्नाटकचे जलसंपदा मंत्री बसवराज बोम्माई म्हणाले, की कृष्णाचे खोरे हे महाराष्ट्रासह कर्नाटकमध्ये पसरलेले आहे. जेव्हा पाऊस खूप होतो, तेव्हा पाणी हे खूप वेगाने जाते. हे पाणी टप्प्याटप्प्याने जाणे हे अत्यंत योग्य ठरेल. त्यासाठी ४८ तास लागेल व त्यामुळे पुरस्थिती नियंत्रणात राहणे शक्य होईल. दूधगंगा प्रकल्प हा आमच्याबाजूने पूर्ण आहे. त्यांच्या बाजूने प्रलंबित आहे. त्यांनी प्रकल्प पूर्ण करण्याची तयारी दाखविली आहे. आम्हीही पावसाळ्यात महाराष्ट्राला पाणी पुरविण्याबाबत सहमत आहोत.
हेही वाचा-पर्यटनला जाण्याचा विचार करताय, तर ही बातमी अवश्य वाचा.. सरकार काढणार नवा आदेश !
पुरस्थिती रोखण्यासाठी चर्चा
महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले, आम्ही महाराष्ट्र आणि कर्नाटकबाबत आज खूप चर्चा केली आहे. पुरस्थितीबाबत गेल्या काही वर्षांपासून आमच्यामध्ये समन्वय आहे. गेल्या २४ तासांपासून कोल्हापूर परिसरात पाऊस सुरू आहेत. त्यामुळे पुरस्थिती रोखण्यासाठी चर्चा करण्यात आली आहे.
हेही वाचा-पूर नियंत्रणासाठी महाराष्ट्र-कर्नाटकमध्ये समन्वय गरजेचा; यंदाही कोल्हापूर, सांगलीला महापुराची धास्ती
गेल्या ३ दिवसांपासून दोन्ही जिल्ह्यात मुसळधार -
गेल्या ३ दिवसांपासून कोल्हापुरसह सांगली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. कोल्हापुरातील पंचगंगा नदी आणि सांगलीतील कृष्णा नदी इशारा पातळीकडे वाटचाल करत आहे. सद्या कोल्हापूरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी ३३.०८ फुटांवर आहे तर सांगलीतील कृष्णा नदीची पाणीपातळी सुद्धा २४ फुटांवर पोहोचली आहे. अवघ्या ३ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी पातळी वाढत असल्याने यावर्षीही दोन्ही जिल्ह्यांना संभाव्य महापुराचा धोका आहे. शिवाय राधानगरी, चांदोली, कोयना धरणातूनसुद्धा पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील प्रशासन संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज झाले आहेत.