पलामू : झारखंडच्या पलामू येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका बीएसएफ जवानाने छोट्याशा वादातून चार जणांवर चक्क तलवारीने हल्ला केला. या घटनेत एका व्यापाऱ्याचा मृत्यू झाला असून त्याची पत्नी आणि सून गंभीर जखमी आहेत. हल्ला केल्यानंतर जवानाने स्वत:ला घरातच कोंडून घेतले होते. अथक परिश्रमानंतर पोलिसांनी घराचा दरवाजा उघडून त्याला अटक केली आहे.
जमिनीच्या वादातून हल्ला केला : ही घटना पलामूच्या पाडवा पोलीस स्टेशन हद्दीतील गोल्हाना गावातील आहे. गोल्हाना येथील व्यापारी सत्यदेव तिवारी आणि बीएसएफ जवान उमिल उर्फ रूपेश तिवारी यांच्यात जमिनीचा वाद होता. दोघांच्या घरातून एक नाला जातो ज्यावर दोघेही स्वतःचा दावा सांगतात. सुमारे आठवडाभरापूर्वी जमिनीचे मोजमाप करण्यात आले. त्यात नाल्याचा भाग सत्यदेव तिवारी यांचा असल्याचे सांगण्यात आले होते.
एकाचा मृत्यू, तिघे दवाखान्यात दाखल : जमिनीचे मोजमाप केल्यानंतर जवान रुपेश तिवारी नाराज झाला होता. मंगळवारी तो गावात हातात तलवार घेऊन फिरत होता. त्यानंतर दुपारी तो अचानक सत्यदेव तिवारी यांच्या घरात घुसला आणि त्याने त्यांच्यावर तलवारीने हल्ला केला. जवानाने सत्यदेव तिवारी, त्यांची पत्नी आशा तिवारी, धाकटी सून आणि भाऊ यांच्यावर हल्ला केला. यानंतर त्याने सत्यदेव तिवारी यांची दुचाकीही पेटवून दिली. घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांनी सत्यदेव तिवारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. जिथे डॉक्टरांनी सत्यदेव तिवारी यांना मृत घोषित केले, तर त्यांची पत्नी आशा तिवारी आणि सून यांना उपचारासाठी रिम्समध्ये पाठवले आहे.
आरोपी जवानाला अटक : घटनेनंतर बीएसएफ जवान रूपेश तिवारी याने स्वतःला घरात कोंडून घेतले होते. घटनेची माहिती मिळताच एएसपी ऋषभ गर्ग आणि पाडवा पोलिस स्टेशनचे प्रभारी नकुल शहा यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. यानंतर अथक परिश्रमानंतर त्यांनी जवानाला घराबाहेर काढले. पलामूचे एसपी चंदन कुमार सिन्हा यांनी सांगितले की, आरोपी जवानाला अटक करण्यात आली आहे. तो शुद्धीवर आल्यानंतर त्याची चौकशी केली जाईल. या घटनेनंतर गोल्हाणामध्ये तणावाचे वातावरण आहे. मृत सत्यदेव तिवारी यांच्या पत्नी आशा तिवारी या पंचायतीच्या माजी प्रमुख होत्या.
हेही वाचा :