श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या अवंतीपोरामध्ये पोलिसांना दहशतवाद्यांचा एक छुपा तळ सापडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा तळ हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा आहे. अवंतीपोरा पोलिसांनी बुधवारी याबाबत माहिती दिली. हा तळ उद्ध्वस्त करण्यात आला असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.
अवंतीपोरा पोलीस, ४२ रायफल्स आणि सीआरपीएफच्या १८० बटालियनने संयुक्तपणे ही कारवाई केली. सीर/पस्तूना भागामध्ये असा तळ असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार या भागामध्ये शोधमोहीम राबवण्यात येत होती. हा तळ सापडल्यानंतर उद्ध्वस्त करण्यात आला, अशी माहिती पोलिसांनी दिली. तसेच, या ठिकाणाहून हिजबुल या दहशतवादी संघटनेचे काही साहित्य, भांडी आणि खाण्याचे सामान जप्त करण्यात आले असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.
याप्रकरणी त्राल पोलीस ठाण्यामध्ये संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, जप्त केलेल्या साहित्याच्या मदतीने पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा : फारुख अब्दुल्ला यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; देशद्रोहाचा आरोप करणारी याचिका फेटाळली