नवी दिल्ली : युक्रेन आणि रशियाच्या युद्धाचा परिणाम जगातील अनेक देशांवर होत आहे. त्यामुळे जगातील देश आपले लष्करी सामर्थ्य वाढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. भारतही आपले लष्करी सामर्थ्य वाढवण्यासाठी अमेरिका आणि रशियाकडून 200 दशलक्ष डॉलर खर्चून क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करणार असल्याची योजना आखत आहे. संरक्षण दलाने दिलेला हा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाच्या चर्चेच्या अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भारतीय युद्धनौकांवर रशियाचे क्षेपणास्त्र : संरक्षण दलाच्या वतीने देण्यात आलेल्या प्रस्तावानुसार भारतीय नौदलाने रशियाकडून 20 क्लब अँटी शिप क्रूझ क्षेपणास्त्रे खरेदी करण्याचे ठरवले आहे. त्यासह संरक्षण दलाने अमेरिकन हार्पून जहाजविरोधी क्षेपणास्त्र प्रणाली रशिया आणि अमेरिकेकडे प्रस्तावित केली आहे. संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रशियाचे क्लब क्षेपणास्त्र भारतीय नौदलाच्या युद्धनौका आणि पाणबुड्या या दोन्हीच्या पृष्ठभागावर तैनात केले जाऊ शकते. भारतीय लष्कर दीर्घ काळापासून ही यंत्रणा आयात करत आहे.
हार्पून क्षेपणास्त्र येणार इतका खर्च : हार्पून क्षेपणास्त्र प्रणालीसाठी भारताला सुमारे 80 दशलक्ष डॉलर्सचा खर्च अपेक्षित आहे. अमेरिकन संसदेने हार्पून जॉइंट कॉमन टेस्ट सेट (JCTS) आणि संबंधित उपकरणे भारताला विकण्यास यापूर्वीच मान्यता दिली आहे. भारत पारंपरिकपणे रशियन शस्त्रास्त्र प्रणाली वापरत आहे. परंतु गेल्या दोन दशकात भारताने अमेरिका आणि फ्रान्सकडून मोठ्या प्रमाणावर क्षेपणास्त्र खरेदी केली आहे. त्यामुळे भारतीय सैन्य अधिक मजबूत झाले आहे. भारतीय नौदलाने आधीच पाणबुडीविरोधी युद्ध विमाने आणि पाणबुड्यांवर हार्पून क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत.
क्षेपणास्त्रामुळे वाढणार भारताचे सामर्थ्य : भारतीय संरक्षण दलाने क्षेपणास्त्र खरेदीचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे संरक्षण मंत्रालयाने या खरेदीस मान्यता दिल्यास भारताचे सामर्थ्य अनेक पटीने वाढणार आहे. जग सध्या युक्रेन आणि रशियाच्या युद्धामुळे चिंतीत आहे. त्यामुळे भारताला आपल्या लष्करी सामर्थ्यात वाढ करणे गरजेचे आहे.
हेही वाचा - Suicide Attack At Pakistan : पाकिस्तानच्या स्वात खोऱ्यात आत्मघाती हल्ला, पोलिसांसह 10 जण ठार