भोपाळ : मध्य प्रदेश पोलिसांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत वाढत्या पाकिटमारीच्या घटनांबद्दल राजस्थान पोलिसांना सतर्क केले आहे. (MP Police alerted Rajasthan Police). पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील आगर माळवा जिल्ह्यात यात्रेच्या शेवटच्या टप्प्यात पाकिटमारांचा सुळसुळात वाढला होता. (incidents of pickpocketing during Bharat Jodo Yatra). पोलिसांनी तेथे आठ ते दहा पाकिटमार पकडले होते. त्यापैकी काही राजस्थानमधील कोटा आणि झालावाड येथील, तर काही गुना, राजगढ, शाजापूर येथील आहेत. मध्य प्रदेश पोलिसांनी राजस्थान पोलिसांना पत्र लिहून यात्रेदरम्यान पाकिटमारांपासून सावध राहावे, असे सांगितले आहे.
जेवणाच्या वेळी चोरीच्या घटना : 5 डिसेंबर रोजी भारत जोडो यात्रा मध्य प्रदेशातून राजस्थानात दाखल झाली. यात्रा 21 डिसेंबर रोजी हरियाणामध्ये प्रवेश करण्यापूर्वी राजस्थानमध्ये सुमारे 500 किमीचा प्रवास करेल. संबंधित अधिकाऱ्याने सांगितले की, आगर माळव्यातील यात्रेदरम्यान आरोपींनी चोरलेल्या इतर गोष्टींसह आम्ही पाच ते सहा मोबाईल जप्त केले आहेत. सायबर पोलिसांनाही यात सामील करण्यात आले आहे. यात्रेतील किमान चार ते पाच लोकांनी त्यांच्या मौल्यवान वस्तू हरवल्याची तक्रार केली आहे. यात्रेच्या शिबिरांमध्ये दुपारचे आणि रात्रीचे जेवण दिले जात असताना बहुतेक चोरीच्या घटना घडल्या आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले.
मोजकेच लोक तक्रारी दाखल करत आहेत : एका स्थानिक काँग्रेस नेत्याने मोर्चादरम्यान दोन मोबाईल फोन हरवल्याची तक्रार केली आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही ज्यांचे मोबाईल हरवले आहेत त्यांना विनंती करत आहोत की, त्यांनी त्यांचे सिम ब्लॉक करून घ्यावे. जेणेकरून चोर या गॅझेटमध्ये नवीन सिम टाकतील तेव्हा आम्ही त्यांचा माग काढू शकू. राहुल गांधींसोबत बुरहानपूर ते आगर माळवापर्यंत यात्रा करणाऱ्या काँग्रेस नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, त्यांचा 28,000 रुपये किमतीचा मोबाईल हरवला आहे. मोर्चाचे कव्हरेज करणारे आगर माळवा येथील स्थानिक पत्रकार महेश शर्मा यांनी आरोप केला की यात्रेत सहभागी होताना 100 हून अधिक लोकांनी आपले सामान गमावले. परंतु त्यापैकी मोजकेच लोक पोलिसांकडे तक्रारी दाखल करण्यासाठी पुढे आले आहेत.