ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) : आत्तापर्यंत तुम्ही कुटुंबांमध्ये जमीन मालमत्ता आणि सोन्या - चांदीच्या वाटणीची कहाणी ऐकली असेल, पण ग्वाल्हेरमध्ये असे एक विचित्र प्रकरण समोर आले आहे, की ते ऐकून तुम्ही थक्क व्हाल! ग्वाल्हेरच्या कौटुंबिक न्यायालयात चक्क दोन पत्नी आणि एक पती यांच्यात वाटणी झाली आहे. पती एका पत्नीसोबत आठवड्यातून ३ दिवस आणि दुसऱ्या पत्नीसोबत ३ दिवस राहील असा करार करण्यात आला असून, रविवारी पती आपल्या इच्छेनुसार दोन्ही पत्नींपैकी कोणत्याही एका पत्नीसोबत राहू शकतो.
काय आहे संपूर्ण प्रकरण? : हा पती हरियाणातील एका बहुराष्ट्रीय कंपनीत अभियंता आहे आणि त्याने 2018 मध्ये एका महिलेशी लग्न केले. लग्नानंतर ते एकमेकांसोबत राहत होते. परंतु 2020 मध्ये जेव्हा कोरोनाच्या काळात लॉकडाऊन लागू करण्यात आला, त्यानंतर पती पत्नीला सोडण्यासाठी ग्वाल्हेरमध्ये तिच्या माहेरी आला आणि तिला तेथे सोडून पुन्हा हरियाणात परतला. कोरोनाच्या कालावधीनंतर तो पत्नीला घेण्यासाठीही आला नाही. दरम्यानच्या काळात कंपनीत काम करणाऱ्या एका महिलेसोबत त्याचे संबंध वाढले आणि त्यानंतर त्याने या महिलेशी दुसरे लग्न केले.
कौटुंबिक न्यायालयात समुपदेशन : पहिली पत्नी ग्वाल्हेर येथील तिच्या माहेरच्या घरी पतीची वाट पाहत होती. पण जेव्हा तिचा संयम तुटल्यानंतर ती तिच्या पतीच्या कंपनीत पोहोचली, तेव्हा तिला कळले की, पतीने कंपनीत काम करणाऱ्या महिलेसोबत दुसरे लग्न केले आहे. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि वाद झाल्यानंतर पत्नीने ग्वाल्हेरच्या कौटुंबिक न्यायालयात याबाबत तक्रार दाखल केली. पतीने दुसरं लग्न केलं आहे, त्यामुळे तिला उदरनिर्वाहासाठी न्याय हवा, अशी तक्रार तिने केली. यानंतर हे प्रकरण कुटुंब न्यायालयात समुपदेशक हरीश दिवाण यांच्यापर्यंत पोहोचले. त्यानंतर या प्रकरणाचे समुपदेशन करण्यात आले.
आता पती दोन्ही पत्नींना सांभाळणार : समुपदेशक हरीश दिवाणे यांनी सांगितले की, 'महिलेच्या पतीशी माझे बोलणे झाले आणि त्यानंतर जवळपास 6 महिने हे प्रकरण असेच सुरू राहिले. नंतर पत्नी आणि पती दोघांनाही कौटुंबिक न्यायालयात बोलावण्यात आले. तेथे तिघांचीही चर्चा झाली आणि यावर तोडगा निघाला. समुपदेशनातून पती एका पत्नीसोबत ३ दिवस आणि दुसऱ्या पत्नीसोबत ३ दिवस राहील असा निर्णय घेण्यात आला. तर रविवारी पतीने पूर्णपणे स्वतंत्र असेल म्हणजेच तो कोणत्याही पत्नीसोबत त्याच्या इच्छेनुसार राहू शकेल. या निर्णयानंतर पत्नी आणि पती दोघेही खूप आनंदी आहेत. या करारासह पतीने दोन्ही पत्नींना एक एक फ्लॅट दिला आहे आणि आता तो दोघींचीही देखभाल करणार आहे.
हेही वाचा : Lokendra Singh Kalvi Death : करणी सेनेचे संस्थापक लोकेंद्र सिंह कालवी यांचे निधन, जाणून घ्या जीवनप्रवास