गांधीनगर - पराक्रम आणि आधुनिकतेचा अवलंब याचा विचार केल्यास अटकेपार झेंडा रोवणारे महाराष्ट्रातील लोक सर्वात पराक्रमी मानले पाहिजेत आणि आधुनिक प्रगतीच्या बाबतीत गुजराती माणसाला तोड नाही असेच म्हणावे लागेल. महाराष्ट्राचा पराक्रम तर आपल्याला माहीतच आहे. आज आम्ही तु्म्हाला गुजरातमधील काही गावांचा फेरफटका मारून आणणार आहोत. ज्या गावांची आणि त्यातील गावकऱ्यांची कामगिरी पाहिली तर मोठ्या शहरांनाही लाजवेल अशी त्यांनी प्रगती केल्याचे दिसून येईल.
आदर्श गाव जेठीपुरा - साबरकांठा जिल्ह्यातील हे एक फक्त 1300 लोकवस्तीचे छोटेसे गाव. समरस गाव म्हणून हे गाव ओळखले जाते. गेल्या 15 वर्षांपासून या गावात ग्रामपंचायत निवडणूक झाली नाही. सर्वमताने लोकनियुक्त सरपंच या गावाचा कारभार पाहतात. गावाला दोन राष्ट्रीय पुरस्कारांसह इतर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. गावात एकही सफाई कर्मचारी नाही मात्र गावात कुठेही तुम्हाला कचरा दिसणार नाही. गावचे सरपंच भट्ट एहसान अली सांगतात, गावात टोकनद्वारे सर्वांना स्वच्छ आरओचे पाणी, आधुनिक ग्रंथालय, ड्रेनेज व्यवस्था, सर्वत्र स्ट्रीटलाईटची सोय केली आहे. शाळा ए ग्रेडची आहे. रुग्णांवर केवळ 50 रुपयात तज्ञ डॉक्टरांच्याकडून उपचार करता येतात असे अली अभिमानाने सांगतात. गावातील 100 टक्के लोक शौचालयाचा वापर करतात. पर्यावरण रक्षणासाठी 3200 झाडे लावण्यात आली आहेत, असे त्यांनी सांगितले.
सरपंच भट्ट सांगतात की, गावातील शाळा आदर्श आहे. सर्व आधुनिक शिक्षणाच्या सुविधा शाळेत आहेत. इंटरनेट वायफाय तसेच प्रोजेक्टरद्वारे मुलांना शिकवले जाते. शाळेतच उत्तम पोषण आहार देण्यात येतो. गावातील एकही मूल कुपोषित नाही. रंगीबेरंगी भित्तीचित्रे काढून आनंददायी शिक्षणाचा अनुभव या शाळेमधून विद्यार्थ्यांना मिळतो. गावकऱ्यांच्या सक्रिय सहभागामुळेच एवढी प्रगती साधता आली असे सरपंच भट्ट अभिमानाने सांगतात.
आधुनिकतेचे प्रतीक पुंसरी गाव - आधुनिक गाव असते तरी कसे, याचे मूर्तिमंत उदाहरण पाहायचे असेल तर गुजरातमधील साबरकांठा जिल्ह्यातील पुंसरी गावाला भेट दिलीच पाहिजे. या गावाची महती ऐकून 60 देशांमधील 138 प्रतिनिधींनी या गावाला भेट दिली आहे. डिजीटल गाव म्हणूनही या गावाची खास ओळख आहे. गावचे माजी सरपंच हिमांशू पटेल यांनी या पुंसरी गावाचा अक्षरशः कायापालट केला. 2011 साली सर्वश्रेष्ठ ग्रामपंचायत तर 2015 साली देशातील सर्वश्रेष्ठ सरपंच म्हणून त्यांना पुरस्कार मिळाला आहे. पटेल यांनी सांगितले की, अंगणवाडीपासून माध्यमिक शिक्षणापर्यंत सर्वच बाबतीत आम्ही आधुनिकतेची कास धरली. गावात सीटीव्ही कॅमेरे, आरओ प्लँटमधून पाण्याची व्यवस्था, स्वच्छ व सुंदर काँक्रीटचे रस्ते गावात वायफायची सुविधा. मुलांना डिजीटल तंत्रज्ञाने दिले जाणारे शिक्षण ही या गावाची खासियत असल्याचे पटेल यांनी सांगितले.
शाळेत पौष्टिक आहारही दिला जातो. एसी बरोबरच प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही असल्याने सर्वांचे मुलांवर लक्ष असते, असे शिक्षिका भगवती यांनी सांगितले. डिजीटल बोर्डवर मल्टिमीडीयाच्या वापरातून आनंदादाई शिक्षण मुलांना देण्यात येते, असेही त्या म्हणाल्या. गावात वॉटरप्रुफ स्पीकर लावण्यात आले आहेत. त्यावरुन भक्तीसंगीत ऐकवण्यात येते. तसेच सरपंच गावकऱ्यांसाठी मौलिक सूचना स्पीकरवरुन नियमितपणे देत असतात. घरोघरी संगणक, मोबाईल, वायफायची सुविधा आहे. तसेच 24 तास सीसीटीव्हीची निगराणी असल्याने चोरीमारी होत नाही असेही पटेल यांनी स्पष्ट केले.
गावातील सुविधा पाहून हे गाव पाहण्यासाठी लोक दूर-दूरवरुन येतात असे तलाठी गायत्रीबेन चौधरी यांनी सांगितले. आधुनिक बसस्थानकावर येथे प्रतीक्षालयही आहे. सुमारे 6000 लोकवस्तीच्या या छोट्याश्या गावातील बहुतांश लोक शेतकरी आहेत हे आणखी एक विशेष. शेतीबरोबरच पशुपालनाचाही ते व्यवसाय करतात. डेअरीला दूध घेऊन जाण्यासाठी गावाने बसचीही व्यवस्था केली आहे. गावकरी सर्वच सुविधांच्यासाठी पटेल यांचे आभार मानतात.
NRI चे गाव आफवा - या गावाचे वैशिष्ठ्य म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरात जेव्हा एकच होते, तेव्हापासून आफवा गाव एक आदर्श गाव म्हणून प्रसिद्ध आहे. या गावात 1975 सालीच भूमिगत गटार योजना राबवण्यात आली होती. यासाठी गुजरात- महाराष्ट्राच्या संयुक्त अधिवेशनातच गावाला आदर्श गावाचा पुरस्कार मिळाला होता, असे येथील माजी सरपंच लल्लुभाई पटेल यांनी सांगितले. सुरत जिल्ह्यात हे गाव आहे. गावातील 80 टक्के लोक एनआरआय म्हणजेच अनिवासी भारतीय आहेत. या गावात प्रवेश करताच कुठेतरी परदेशात गेल्याचा फील येतो.
गावात भक्तीमय वातावरणातच सूर्योदय होतो, असे पटेल यांनी सांगितले. संपूर्णपणे भूमिगत वायरिंग असल्याने कुठेही विजेची, केबलटीव्ही किंवा फोनची तार दिसत नाही. गावात शहराप्रमाणे रिंगरोडची संकल्पना राबवली आहे. त्यामुळे कोणतेही अवजड वाहन गावात येत नाही. प्रदुषणाला आळा बसतो. रस्ते खराब होत नाहीत. गावातील बहुतेक लोक परदेशी असल्याने येथील शेती गावात राहणाऱ्या लोकांकडून सहकारी तत्वावर केली जाते. शेतीच्या सर्वसुविधा तीन सहकारी संस्थांमार्फत पुरवल्या जातात. गावातील जुने जाणकार असलेले पियत मंडलचे संस्थापक अध्यक्ष कमलेश पटेल यांनी ही माहिती दिली. सिंचन व्यवस्थाही सहकारी तत्वावर केली जाते असेही त्यांनी सांगितले. पाटीदार, हलपती, महावंशी समुदायाचे या गावातील परदेशी असलेले लोक नोव्हेंबर डिसेंबरमध्ये गावी येतात. यावेळी गावाच्या प्रगतीसाठी ते चर्चा करतात आणि आणखी आधुनिक सुविधा गावात आणण्याचे निर्णय घेतात असे सरपंचांनी सांगितले. अशा प्रकारे गावाचा निरंतर विकास सुरू आहे.
भूकंपातून फिनिक्स भरारी घेणारे भीमासर गाव - कच्छ जिल्ह्यातील भीमासर गाव 2001 साली भूकंपाने नष्ट झाले. भूकंपात 19 गावकऱ्यांचा जीव गेला. मात्र त्यावेळपासून या गावाने शून्यातून प्रगती केली. या गावात 90 टक्के लोक टॅक्स देतात. त्यासाठी गावाला तीनवेळा पुरस्कर मिळाला आहे. भूकंपानंतर सहारा वेलफेअर फाउंडेशनने गावाचा कायापालट केला, असे गावकरी व्ही के हुंबल यांनी सांगितले. गावात स्ट्रीटलाईट आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे तसेच चोख सुरक्षा व्यवस्था असल्याने गेल्या 40 वर्षात एकही चोरी झालेली नाही. कुटुंबासोबत कामासाठी असलेल्यांना गावात राहण्यास परवानगी आहे. मात्र कामानिमित्त एकटे आलेल्यांच्यासाठी जवळच्या गावात वेगळी व्यवस्था करण्यात येते.
उष्ण वाळवंटी प्रदेश असला तरी भीमासर गावात सर्वत हिरवळ दिसते. पावसाचे पाणी साठवण्यासाठी गावात 6-7 तलाव बांधण्यात आलेत. त्यामुळे 1-2 वर्षे त्यामध्ये पाणी साठून राहते. नर्मदेचे पाणीही गावाला मिळते. दरवर्षी दीड हजार झाडे लावली जातात आणि ती जगवली जातात, असे गावकऱ्यांनी सांगितले. बँक, शाळा, पंचायत, पोस्ट ऑफिस अशा सर्वच आधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या या गावाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत, असे हुंबल यांनी सांगितले. तसेच गावाला समरस गाव पुरस्कार, स्वर्णिम ग्राम पुरस्कारासह निर्मल ग्राम पुरस्कार मिळाल्याची माहिती सरपंचांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नातील आत्मनिर्भर गावाची संकल्पना या गावात राबवली जाते.
भारतीतील सर्वात श्रीमंत धर्मज गाव - धर्मज गाव गुजरातमधील आणंद जिल्ह्यात आहे. या गावातील प्रत्येक घरातील किमान एक-दोन लोक परदेशात राहतात. गावात 11 बँकांच्या शाखा आहेत. विशेष म्हणजे या बँकांमध्ये कर्जापेक्षा ठेवीच जास्त असल्याचे दिसते. त्यामुळे धर्मज गाव बँकिंग क्षेत्रातील एक व्यापार केंद्रच झाले आहे.
लोकांच्याकडे पैसा भरपूर असल्याने गावात चांगल्या सुखसुविधा आणि सुबत्ता आहे. वर्षातून एकदा परदेशात गेलेल्या गावातील लोकांचे संमेलन भरवण्यात येते. सर्व सामाजिक घटकातील लोक या गावचे रहिवासी आहेत. त्यामध्ये पाटीदार, वणिक, ब्राह्मण, सोनी, सुथार, नाई, ठाकोर, भोई, प्रजापति, दलित समुदारांचा समावेश आहे. गावातील सूरजबा पार्कमध्ये सर्वांसाठी अल्पदरात स्वीमिंग पूल, बोटिंगची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. स्वच्छ सुंदर रस्ते झाडी यामुळे हे गाव एखाद्या शहराप्रमाणे भासते. या गावची लोकसंख्या फक्त 11 हजार 333 एवढी आहे. धर्मजमध्ये ग्राम सहकारी बँकेची सुरुवात 16 जनवरी 1969 मध्ये झाली. याचे संस्थापक अध्यक्ष धर्मजचे सुपुत्र देशाचे एकेकाळचे वित्त मंत्री एच. एम. पटेल होते. आता 11 बँका असलेले सर्वाधिक ठेवीदारांचे गाव अशा या गावाची खासियत आहे.
जगातील असा एकही देश नाही ज्या देशात धर्मजचा मूलनिवासी नाही. शंभर वर्षापूर्वी या छोट्याशा गावातले काही पटेल युगांडा आणि ब्रिटनमध्ये स्थायिक झाले. आज या गावातील 3000 हून अधिक कुटुंबे जगभरातील देशांमध्ये स्थायिक झाली आहेत. मर्सिडीज, ऑडी, बीएमडब्ल्यू सारख्या महागड्या गाड्या गावातील रस्त्यांवर धावताना दिसतात. धर्मजमध्ये हॉटेल, कॅफे, मुलांसाठी बाग, सिमेंट रस्ते, शाळा, कॉलेज, आरोग्याशी संबंधित सर्व सुविधांनी सुसज्ज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहेत. 12 जानेवारीला दरवर्षी मोठ्या संख्येने परदेशात स्थायिक झालेले NRI कुटुंबासह गावात येतात. ज्यामध्ये मोठ्या संख्येने परदेशात स्थायिक झालेले NRI कुटुंबासह येतात. एका अंदाजानुसार या गावातील 1700 कुटुंबे ब्रिटनमध्ये, 800 कुटुंबे अमेरिकेत, 300 कुटुंबे कॅनडात, 150 कुटुंबे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड देशांमध्ये स्थायिक आहेत.
गावातील लोक विदेशात असले तरी त्यांची गावाबरोबर जोडलेली नाळ त्यांनी आजपर्यंत तुटू दिलेली नाही. परिणामी गावामध्ये जागतिक दर्जाच्या सोई सुविधा आणि सुबत्त पाहायला मिळते. पंतप्रधान मोदी नेहमी म्हणतात जर विकास पाहायचा असेल तर गुजरातमध्ये जाऊन पाहा. आता या काही गावांचे मासलेवाईक उदाहरण पाहिले तर अशी अनेक गावे गुजरातमध्ये पाहायला मिळतील हेच खरे.
झाडांचे गाव कुनारिया - कच्छ तालुक्यातील कुनारिया गाव प्रसिद्ध आहेत क्लीन गाव म्हणून. गेल्या 6 वर्षांपासून झाडे लावून येथे पावसाचे प्रमाण वाढवण्याचा सामूहिक प्रयत्न होत आहे. गावात आणि आसपासच्या भागात जवळपास दीड लाखाहून जास्त झाडे लावण्यात आली आहेत. प्लास्टीक मुक्त गाव म्हणूनही या गावाची ख्याती आहे. गावात कुठेच सिंगल यूज प्लास्टीक वापरले जात नाही. गावच्या महिला सरपंचांनी सांगितले की 500 कुटुंबांना आधुनिक चुलींचे वाटप करण्यात आले आहे. जेणेकरुन कार्बन उत्सर्जन कमी होईल.
गावचे नेते आणि माजी सरपंच सुरेश छंगा यांनी सांगितले की हे गाव आता कार्बन न्यूट्रल गाव म्हणून नवी ओळख निर्माण करत आहे. पर्यावरण संरक्षणाबरोबरच चांगले शिक्षण आणि शहरात मिळणाऱ्या इतर सर्व सुविधा गावात गावकऱ्याना मिळत असल्याचे छंगा यांनी स्पष्ट केले. देशातील पहिली बालिका पंचायत या गावात आहे. ग्रामस्थ कौलाशभाई यांनी सांगितले की या प्रकारच्या प्रयोगामुळे गावात चांगल्या प्रकारे महिला सशक्तीकरण झाले आहे. विशेषतः मुलांच्या शिक्षणामध्ये त्यामुळे स्मार्ट क्लासरूमद्वारे उत्तम काम होत आहे.